नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट'(Sairat) हा चित्रपट २०१६ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटानं संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावलं. चित्रपटाची कथा असो वा ‘याड लागलं’, ‘सैराट झालं जी’ अशी चित्रपटातील गाणी असो या सिनेमानं प्रेक्षकांच्या मनावर खऱ्या अर्थानं राज्य केलं. आर्ची व परशा ही पात्रं घराघरात पोहोचली आणि या सिनेमानं कमाईचे नवीन विक्रम रचले. रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांना मोठी लोकप्रियता मिळाली. आज नऊ वर्षांनंतरही या चित्रपटाची लोकप्रियता कमी झाल्याचे दिसत नाही. आता हा सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २१ मार्च २०२५ ला हा सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता त्या निमित्ताने चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता आकाश ठोसरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
नऊ वर्षांचा प्रवास…
अभिनेता आकाश ठोसरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सैराट चित्रपटातील शूटिंगदरम्यानचे काही फोटो दिसत आहेत. ज्यामध्ये आर्टी व परशा यांच्यातील काही सुंदर क्षण पाहायला मिळत आहे. हे फोटो शेअर करताना अभिनेत्याने लिहिले, “सैराट हा चित्रपट शूट करतानाचा पूर्ण प्रवासच आमच्यासाठी स्वप्नवत होता आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरचा नऊ वर्षांचा प्रवास तुम्ही बघतच आला आहात. आज नऊ वर्षांनी ‘सैराट’ परत प्रदर्शित होतोय याचा आम्हाला आज खरंच खूप आनंद होत आहे. आम्ही परत मोठ्या पडद्यावर आर्ची-परशा म्हणून तुम्हाला भेटायला येतोय.”
पुढे आकाश ठोसरने लिहिले, “हे फक्त नागराजअण्णांमुळे शक्य झालं. ‘सैराट’मुळे आमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि त्याबद्दल आम्ही अण्णांचे कायम ऋणी राहू. तसेच, तुम्हा सगळ्यांच्या प्रेमासाठीही धन्यवाद!” त्याने प्रेक्षकांना पुन्हा ‘सैराट’ चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. ही पोस्ट शेअर करताना त्याने अभिनेत्री रिंकू राजगुरूलादेखील टॅग केले आहे.
अभिनेत्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर, किशोरी शहाणे यांचादेखील समावेश आहे. तसेच चाहत्यांनीदेखील त्याचे कौतुक केले आहे. “मी पुन्हा एकदा ‘सैराट’ पाहण्यास तयार आहे”, “हा माझा सर्व काळ आवडता चित्रपट आहे. मी कर्नाटकचा आहे. पण मला ‘सैराट’चित्रपट खूप आवडतो”, “सैराटचा दुसरा भाग आणा”, “तो उत्तम मराठी चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे”, ” ‘सैराट २’ची वाट बघत आहे”, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करीत त्यांचे प्रेम व्यक्त केले आहे.

सैराट चित्रपटात आकाश ठोसर हा परशा या पात्रात दिसला होता. तर अभिनेत्री रिंकू राजगुरू ही आर्ची या भूमिकेत दिसली होती. या दोन कलाकारांबरोबरच तानाजी गालगुंडे, अरबाज शेख, सूरज पवार, छाया कदम, सुरेश विश्वकर्मा असे अनेक कलाकार दिसले होते. आता सैराट पुन्हा एकदा प्रेक्षकांची गर्दी खेचून आणण्याची किमया करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सैराट चित्रपटानंतर रिंकू राजगुरूने कागर, अनकहीं कहानियाँ, झुंड, २०० हल्ला हो, झिम्मा २ अशा चित्रपटात काम करत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तर आकाश ठोसरने फ्रेंडशिप अनलिमिटेड, लस्ट स्टोरीज, झुंड अशा चित्रपटात काम केले आहे.