गेल्या काही वर्षांपासून राज्यातील सत्तासंघर्ष हा चर्चेचा विषय ठरत आहे. याच सत्तासंघर्षावर आधारित अनेक चित्रपट, वेबसीरिज प्रदर्शित झाल्या आहेत. आता याच विषयावर आधारित आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘खुर्ची’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच या चित्रपटाचे मोशन पोस्टर समोर आले आहे. तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही ठरली आहे.
‘सत्ता कुणाची पण असो, आता खुर्ची आपलीच’ असं म्हणत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा ‘खुर्ची’ या चित्रपटाचे नवीन मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या मोशन पोस्टरच्या सुरुवातीला निवडणुकीचा धुराळा उडालेला दिसत आहे. तर काही लोक हातात झेंडे घेऊन जल्लोष करताना दिसत आहेत. यात बॅकग्राऊंडला दमदार संवाद आणि गाणीही ऐकायला येत आहेत.
आणखी वाचा : “नाचणीची भाकरी, मच्छी फ्राय अन्…” प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने चुलीवर बनवलं जेवण, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
या सर्व जल्लोषाच्या केंद्रस्थानी एक खुर्ची पाहायला मिळत आहे. ढोल ताशे आणि माणसांच्या इतक्या गर्दीतही ही सत्तेची ‘खुर्ची’ मात्र सोन्यासारखी चमचमत आहे. अगदी राजेशाही असा या खुर्चीचा थाट आहे. याच ‘खुर्ची’साठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
‘खुर्ची’ या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटात अभिनेता अक्षय वाघमारे, आर्यन, राकेश बापट,अभिनेत्री प्रीतम कागणे, अभिनेत्री श्रेया पासलकर, सुरेश विश्वकर्मा, महेश घग, कल्याणी नंदकिशोर हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत ‘आराध्या मोशन फिल्म्स’ आणि ‘योग आशा फिल्म्स’ निर्मित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे आणि योगिता गवळी यांनी सांभाळली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केले आहे.
आणखी वाचा : Video : मायरा वायकुळने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, ‘या’ एका कृतीने वेधलं लक्ष
या चित्रपटाची गाणी प्रशांत मडपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिली आहेत. तर याला सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिले आहे. तर आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपुरकर, रसिका वाखरकर, अमिता घुगरी आणि आर्यन यांनी आपल्या सुमुधुर आवाजाने या चित्रपटासाठी गायन केले आहे. येत्या १२ जानेवारी २०२४ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.