मराठी सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अंकुश चौधरी. अंकुशने आपल्या जबरदस्त अभिनयाने मराठी सिनेसृष्टीत अढळ स्थान निर्माण केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अंकुश सोशल मीडियावर खूप सक्रिय झाला आहे. नुकतीच अंकुश चौधरीने अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून अंकुशने अशोक सराफांबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकुश चौधरीने काही फोटो शेअर करत लिहिलं आहे, “‘अशोक सराफ’ हे नाव आमच्या संपूर्ण पिढीच्या आठवणींशी जोडलेलं आहे. त्यांच्या सिनेमांचे ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ बघणं हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस असायचा. त्यांच्या विनोदी टाइमिंगवर फिदा होणाऱ्या लाखो प्रेक्षकांमध्ये मीही होतो आणि आजही आहे. त्यांचे डायलॉग्स, त्यांची स्टाईल, अभिनयातली सहजता, त्यातील बारकावे पाहिले, की वाटायचं हे असं आपल्यालाही जमायला हवं. म्हणूनच मी प्रेक्षक, अभिनेता आणि आता दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांच्याकडून खूप काही शिकत आलोय आणि अजूनही शिकतोय.”

पुढे अंकुश चौधरी लिहिलं की, माझ्या करिअरच्या सुरुवातीला १९९५ मध्ये ‘सूना येती घरा’ या सिनेमात पहिल्यांदा अशोक सरांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी केवळ त्यांचा अभिनयचं नाही, तर त्यांची सहजता, सेटवरील त्यांची ऊर्जा आणि कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहून मी प्रभावित झालो होतो. त्यानंतर ‘साडे माडे तीन’च्या निमित्ताने दिग्दर्शक म्हणून त्यांच्याबरोबर काम करता आलं आणि आता २०२५ मध्ये ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ सिनेमासाठी आम्ही परत एकदा एकत्र काम केलंय.

राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हा मोठा सन्मान आहे. पण त्यासाठी कमाल मेहनत आणि कायम दिलखुलास राहण्याची वृत्ती या गोष्टी सोप्या नसतात. पण अशोक सराफ हे नाव याला अपवाद आहे. अशोक सराफ सर, तुमच्या कला प्रवासाला सलाम! महाराष्ट्राच्या हृदयात आधीपासूनच तुमचं अढळ स्थान होतं. आज त्यावर ‘पद्मश्री’ची मोहोर उमटली आहे, असं अंकुश चौधरीने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, अंकुश चौधरीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी त्याच्या वाढदिवशी तीन नव्या चित्रपटाची घोषणा झाली. ‘महादेव’, ‘पी.एस.आय.अर्जुन’, ‘नो एंट्री पुढे धोका आहे २ – कॉमेडी ऑफ टेरर्स’ हे अंकुशचे तीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तसंच त्याचं दिग्दर्शन असलेला ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor ankush chaudhari special post for ashok saraf pps