दिग्दर्शक केदार शिंदे यांचा आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट येत्या २८ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर, गाणी हे सर्वच हिट ठरताना दिसत आहेत. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच संपूर्ण टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचा प्रवास कसा सुरु झाला? या चित्रपटासाठी अभिनेता अंकुश चौधरीने कशाप्रकारे तयारी केली? गाण्यांचे व्हायरल होणारे रिल्स यांसह विविध विषयांवर दिग्दर्शक केदार शिंदे, अंकुश चौधरी आणि सना शिंदे यांनी भाष्य केले. यावेळी अंकुशला तू शाहीर साबळेंचा गेटअप केल्यानंतर आणि तुला यासाठी विचारणा केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय होती, याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्याने फारच स्पष्टपणे उत्तर दिले.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात लतादीदी ते बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची नाव समोर, पाहा त्यांची झलक

मी पहिल्यांदा जेव्हा गेटअप केला, तेव्हा मला समजलं की आता मला याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. तोपर्यंत माझा या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. गेटअप झाल्यानंतर केदार कदाचित नाही म्हणेल, तू नीट दिसत नाही, असं म्हणेल असं मला वाटलं होतं. कारण मी स्वत:ला तसं कधीच पाहिलं नव्हतं, असे अंकुश चौधरी म्हणाला.

मला केदारने विचारल्यावर मी मनातून खूप आनंदी होतो. मी यासाठी खूप वर्ष वाट पाहिली. मला कधीतरी एखादा बायोपिक करायला मिळेल. प्रत्येक वेळी सुबोधच या अशा भूमिकांमध्ये दिसायचा. तेव्हा असं अनेकदा वाटायचं की आपल्यालाही असं काही तरी मिळायला हवं. पण मला कधीही मी त्या पात्रासारखा दिसतोय, असं वाटलं नाही.

आणखी वाचा : Video : “चेहऱ्याचे माप, रंग, पेहराव अन्…” अंकुश चौधरीचा शाहीर साबळेंचे पात्र साकारण्याचा प्रवास; पडद्यामागचा व्हिडीओ समोर

मी फक्त महाराष्ट्रातील नाही तर भारतातील देखील अनेक लोक पाहिलेत. मी यांच्यासारखा दिसतो का, त्यांच्यासारखा दिसतो का, कोणीतरी असा असेल, ज्यांच्यासारखा मी दिसतो आणि मग मी त्यांना सांगेन की आपण चित्रपट करुया. पण मला हे कुठेच काहीच दिसत नाही. योगायोगाने हे माझ्याकडे आलं, आम्ही गेटअप केला आणि आरशात पाहिलं, तेव्हा केदारच्या डोळ्यात मला दिसलं की ही जबाबदारी मला घ्यायची आहे. त्यानंतर मग मी याची तयारी सुरु केली, असे अंकुशने सांगितले.

आणखी वाचा : “मला धाकधूक होती की अंकुश चौधरी…” राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

दरम्यान ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात सना शिंदे, अभिनेत्री अश्विनी महांगडे, निर्मिती सावंत यांसह अनेक कलाकार हे महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor ankush chaudhari talk about maharashtra shaheer biopic on shahir sable and subodh bhave nrp
Show comments