पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित आणि दिग्दर्शित जाणता राजा या महानाटयाची सतत चर्चा पाहायला मिळते. या महानाट्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि जीवनचरित्र सांगितले जाते. या महानाट्यासाठी अभिनेते अशोक सराफ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आवाज द्यावा, अशी विनंती बाबासाहेब पुरंदरे यांनी केली होती. मात्र अशोक सराफ यांनी यासाठी नकार दिला होता. त्यामागचे कारणही त्यांनी सांगितले होते.
अभिनेते अशोक सराफ यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘जाणता राजा या नाटकात बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेला आवाज दिला आहे. काही महिन्यांपूर्वी कीर्ति सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार-२०२३’ प्रदान करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी ‘जाणता राजा’ महानाट्याशी असलेला आपला संबंध उलगडून दाखवला. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आवाज न देण्याबद्दलचे कारणही सांगितले.
आणखी वाचा : “तू लग्नात कोणता उखाणा घेतला होतास?” सखी गोखलेला विचारलेल्या प्रश्नावर सुव्रत जोशी म्हणाला, “तिने…”
अशोक सराफ काय म्हणाले?
“बाबासाहेब पुरंदरे यांनी महानाट्यातील छत्रपती शिवाजी महाराजांना आवाज मी द्यावा, असा निरोप पाठवला होता. पण त्यावर मी त्या व्यक्तीला मला आवाज द्यायला काहीही हरकत नाही. पण मी त्यावेळी त्याला म्हटलं, बाबासाहेबांना माझा निरोप दे की मी हे करु शकत नाही. मी रेकॉर्डिंग करु शकत नाही.
त्यावेळी त्याने मला का असे विचारले. त्याला मी म्हटलं की, छत्रपती शिवाजी महाराजांना आवाज द्यायचा याबद्दल मला काही माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, हे मला माहिती नाही. मी त्यांना कधीही पाहिलं नाही. ते कसे बोलत होते. त्यांच्या बोलण्याचा आवाज कसा होता, धीरगंभीर होता की वरच्या स्वरात होता. कोणत्या स्वरात बोलायचं हे देखील मला ठाऊक नाही. तर मग मी कसा त्यांचा आवाज देऊ. त्यामुळे त्यांना सांगा, मला हे जमणार नाही.
कारण महाराष्ट्रात माझा आवाज सर्व जनतेला माहिती आहे आणि तो जर छत्रपती शिवरायांच्या आवाजाच्या रेकॉर्डिंगमध्ये जर मध्येच दिसला तर ते बरोबर वाटणार नाही. हा त्यांचा अपमान केल्यासारखं होईल आणि मला ते करायचं नाही”, असे अशोक सराफ यांनी या कार्यक्रमात म्हटले होते.
“मी एवढ्या मोठ्या व्यक्तीला आवाज देण्याबाबत मी सांशक होतो. तेवढी माझी कुवत आणि लायकीही नव्हती. त्यामुळे मी त्यांना नकार कळविला. परंतु, या महानाट्याशी संबंध जोडला जावा, यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांचा आवाज मी दिला. आजही अनेकांना तो आवाज माझा असल्याचे माहिती नाही”, असेही अशोक सराफ म्हणाले.