मालिका असो, सिनेमा असो किंवा नाटक ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवलं असे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धूमधडाका’, ‘आम्ही सातपुते’ ते नुकताच प्रदर्शित झालेला ‘वेड’ अशा असंख्य गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी खास उपस्थिती लावली होती. याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार देखील यावेळी उपस्थित होते.
फक्त मराठी चित्रपटांमध्येच नव्हे तर बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडत अशोक सराफ यांनी सर्वांनाच आपल्या कामाची दखल घ्यायला लावली. मराठी चित्रपटांची धुरा एकेकाळी ज्या निवडक कलाकारांच्या खांद्यावर होती त्यातलं अशोक सराफ हे खमकं नाव. रंगभूमी, मालिका किंवा चित्रपट असो प्रत्येक ठिकाणी त्यांच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजलं.
गुरुवारी (२२ फेब्रुवारी २०२३ ) रोजी महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर मानाचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला आहे. मुंबईतील वरळी येथे पार पडलेल्या ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
हेही वाचा : …अन् भारती सिंह थक्क झाली! सांगितला माधुरी दीक्षितच्या लेकाचा खास किस्सा; म्हणाली, “सेटवर त्याने…”
अशोक सराफ यांनी मराठीसह बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांना केवळ विनोदीचं नव्हे तर गंभीर भूमिका ते खलनायक अशा अभिनयाच्या विविध बहुरुपी छटा आपल्याला पाहायला मिळाल्या. अशोक सराफ यांना २०२३चा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आल्यावर सध्या सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांसह कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळण्याआधी अशोक सराफ माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले होते, “या क्षणाला मला नंबर १ झाल्यासारखं वाटतंय. आपल्या कार्यभूमीत असं कौतुक होणं ही प्रत्येकासाठीच खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या आजच्या लूकचं पूर्ण श्रेय निवेदिताचं आहे. माझ्यासाठी हा खूप मोठा प्रसंग आहे. माझ्यासाठी हा खूप मोठा सत्कार आहे असं मी समजतो.”