‘नटरंग’, ‘हे राम’, ‘चांदनी बार’ ते ‘रंग दे बसंती’ अशा असंख्य चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजेच अतुल कुलकर्णी. उत्कृष्ट लेखक, अभिनेते, वयाच्या पन्नाशीनंतरही तरुणांना लाजवेल असा फिटनेस, याशिवाय राजकारणावर उत्तम अभ्यास असलेले अतुल कुलकर्णी २००९ पासून मराठी कलाविश्वाचे ‘नटरंग’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांच्या जन्म १० सप्टेंबर १९६५ रोजी कर्नाटकातील सामान्य कुटुंबात झाला. आज अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा ५८ वा वाढदिवस आहे. “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है…” हा डायलॉग बोलणारा ‘रंग दे बसंती’ लक्ष्मण पांडे असो किंवा ‘नटरंग’चा गुणा त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयीच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

…अन् इंजिनिअरिंग शिक्षण अर्धवट सोडलं

अतुल कुलकर्णी यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण सोलापूरात पूर्ण झालं. त्यानंतर त्यांनी अकरावी-बारावी बेळगावमध्ये पूर्ण केली. कौटुंबिक पार्श्वभूमी व्यवसायाची असल्याने त्यांच्या वडिलांना अभिनय क्षेत्रात अतुल कुलकर्णी उत्तम काम करू शकतील याबद्दल आत्मविश्वास नव्हता. त्यामुळे पुण्यात त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला परंतु, पहिल्या वर्षाचा अभ्यास पूर्ण करायाला त्यांना ३ वर्षे लागली. अर्थात ते ३ वेळा नापास झाले आणि आपण कधीच इंजिनिअर होऊ शकत नाही याची जाणीव त्यांना झाली. ड्रॉपआऊट झाल्यावर शिक्षण अर्धवट सोडून ते पुन्हा सोलापूरला परतले. सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतल्यावर त्यांनी रंगमंचावर पहिलं सादरीकरण केलं.

‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मुळे आयुष्याला कलाटणी

कला शाखेची पदवी मिळाल्यानंतर, वयाच्या २७ व्या वर्षी अतुल कुलकर्णी यांनी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये प्रवेश घेतला. याठिकाणीच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळून अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली. या संस्थेमुळे नाटक किंवा अभिनयाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलला असं अतुल कुलकर्णींनी ‘कर्ली टेल्स’च्या मुलाखतीत सांगितलं होतं.

वयाच्या पस्तीशीत पहिला चित्रपट

‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून अभिनयाचं शिक्षण घेतल्यावर अतुल कुलकर्णी ३० व्या वर्षी मुंबईत आले. त्यानंतर वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी ‘हे राम’ हा पहिला हिंदी चित्रपट केला. यामध्ये त्यांनी श्रीराम अभ्यंकर यांची व्यक्तिरेखा साकारली होती. ‘हे राम’ चित्रपटासाठी अतुल कुलकर्णी यांना सहायक अभिनेता म्हणून सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नटरंग’मध्ये त्यांनी गुणवंतराव कागलकर यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाविषयी सांगताना अतुल कुलकर्णी म्हणतात, “‘नटरंग’ची कथा खूपच सुंदर होती. असा चित्रपट यापूर्वी तयार झाला नव्हता…इतकी ती सुंदर कलाकृती होती. ‘नटरंग’ करताना माझ्यापुढ्यात शारीरिक आव्हान होतं. पहिल्या भागात ‘गुणवंतराव कागलकर’ साकारण्यासाठी मला वजन वाढवावं लागलं होतं. त्यानंतर गुणाच्या भूमिकेसाठी मला वजन कमी करावं लागलं…त्याच्या देहबोलीवर विशेष लक्ष केंद्रित केलं. याचं संपूर्ण श्रेय माझे जिम ट्रेनर शैलेश परुळेकर यांना जातं. जवळपास १६ किलो वजन वाढवून आम्ही पहिल्या भागाचं शूटिंग केलं. त्यानंतर दोन महिन्यांचा ब्रेक घेऊन मी जवळपास ४२ दिवसांमध्ये १८ किलो वजन कमी केलं आणि मग दुसऱ्या भागाचं शूटिंग पूर्ण झालं.”

क्वेस्ट’ संस्थेची १४ वर्ष…

अभिनयाशिवाय सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अतुल कुलकर्णी जवळपास १४ वर्ष ‘क्वेस्ट’ या संस्थेसाठी काम पाहत होते. शिक्षण क्षेत्रात काम करण्याच्या हेतूने काही सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांन १ जानेवारी २००७ ‘क्वेस्ट’ (QUEST) ही संस्था स्थापन केली. नीलेश निमकर यांच्या नेतृत्वाखाली अभिनेते या संस्थेसाठी काम करत होते. २००७ ते २०२१ या १४ वर्षांच्या कार्यकाळात या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू मुलांना मदत केली. ‘क्वेस्ट’च्या स्थापनेपासून अतुल कुलकर्णी या संस्थेचे अध्यक्ष होते. परंतु, वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी १ फेब्रुवारी २०२१ ला क्वेस्टच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

‘क्वेस्ट’ संस्था शिक्षणासारख्या मूलभूत क्षेत्रात खूप महत्वाचं काम करत आहे. ‘क्वालिटी एजुकेशन सपोर्ट ट्रस्ट’ हे ‘क्वेस्ट’ संस्थेचे संपूर्ण नाव आहे. अतुल कुलकर्णी औपचारिक सदस्य म्हणून निवृत्त झाले असले तरीही आजही ते या संस्थेच्या संपर्कात असतात. त्यांनी १४ वर्षात, महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यातील, ५ हजार ७०० शाळा आणि अंगणवाड्या…यामधील २ लाख ६० हजार मुलं आणि ९ हजारांहून अधिक शिक्षकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं.

सिटी ऑफ ड्रीम्सबद्दल…

दिग्दर्शक नागेश कुकुनूर यांच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मध्ये अमेयराव गायकवाड या महत्त्वाकांक्षी राजकारण्याची भूमिका अतुल कुलकर्णी यांनी साकारली होती. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा दिग्दर्शकाकडून ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ची कथा ऐकली. तेव्हा त्यांना पहिल्या एपिसोडमध्ये तुम्ही कोमात जाणार आणि त्यानंतर थेट नवव्या एपिसोडमध्ये तुम्हाला जाग येईल असं सांगण्यात आलं होतं. याबद्दल सांगताना अतुल कुलकर्णी म्हणाले, “पहिल्याच दिवशी नागेशने मला अशी स्टोरीलाइन सांगितल्यावर मी थोडा आश्चर्यचकित झालो होतो. पण, त्याच दिवशी त्याने मला दुसऱ्या सीझनचं कथानक थोडक्यात सांगितलं होतं. या सीरिजला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.”

विमा एजंटची नोकरी ते पहिली कमाई…

अभिनयाव्यतिरिक्त सोलापूरला असताना अतुल कुलकर्णींनी विमा एजंट म्हणून नोकरी केली होती. त्यानंतर त्यांनी काही वर्षे वडिलांना व्यवसाय सांभाळण्यात मदत केली. वडिलांबरोबर काम करताना अतुल कुलकर्णींना त्यांचे बाबा प्रति महिना ३५० रुपये द्यायचे. हीच त्यांची पहिली कमाई होती.

फिटनेसचं रहस्य

अतुल कुलकर्णी आज त्यांचा ५८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही तरुणांना लाजवेल असा त्यांचा फिटनेस आहे. त्यांना तळलेले पदार्थ आणि पावाचे प्रकार खायला जास्त आवडत नाहीत. याशिवाय योग्य आहार, योगा, जिम करण्यावर त्यांचा भर असतो.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor atul kulkarni birthday special article social responsibilities along with acting sva 00