मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून भरत जाधव यांना ओळखले जाते. मालिका, चित्रपट, नाटकांच्या माध्यमातून भरत यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आतापर्यंत त्यांनी अनेक विनोदी भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, भरत जाधव सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. भरत जाधव यांची कमाई आणि संपत्तीबाबत अनेकदा चर्चा रंगतात. दरम्यान, एका मुलाखतीत भरत जाधव यांनी त्यांच्या संपत्तीबाबत खुलासा केला आहे.
हेही वाचा- …म्हणून भरत जाधव यांना आहे गाड्यांची हौस; वडिलांनी व्हॅनिटी व्हॅन पाहिली होती तेव्हा…
लवकरच भरत जाधव यांचं ‘अस्तित्व’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने भरत जाधव यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्याला हजेरी लावली होती. या मुलाखतीत भरत जाधव यांनी त्यांच्या करिअरबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत भाष्य केलं आहे.
खडा मारू तिथे भरत जाधव यांची संपत्ती आहे, असे म्हटले जाते? याबाबत काय सांगाल, असा प्रश्न मुलाखतीत भरत जाधव यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना भरत म्हणाले, “नाटकात येण्यापूर्वीपासून माझी एक सवय होती. मी नेहमी नवीन गाडी किंवा जमीन पाहिल्यावर त्याची किंमत विचारायचो. मस्त आहे ना, काय रेट चालला आहे? मला फक्त एवढचं आवडायचं. त्यामुळे माझी प्रॉपर्टी खूप आहे, असा लोकांचा समज झाला. पण, प्रत्यक्षात तसे काहीही नाहीये. खिशात पैसे कुठे आहेत? मी मराठी कलाकार, काय पैसे असणार खिशात?”
भरत जाधव यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांची ‘सही रे सही’, ‘ऑल द बेस्ट’, ‘श्रीमंत दामोदर पंत’ नाटकं प्रचंड गाजली. आता ८ डिसेंबरला त्यांचा ‘लंडन मिसळ’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखिल चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘लंडन मिसळ’ चित्रपटात भरत जाधव हटक्या भूमिकेत दिसणार आहेत.