मराठी नाट्यसृष्टीत आणि सिनेसृष्टीत गाजलेलं नाव म्हणजे भरत जाधव. मालिका, चित्रपट यांच्यापेक्षा नाट्यसृष्टीत त्यांनी अधिक काम केलं. स्वतःचं आयुष्य नाट्यकलेला वाहिलेल्या कलाकारांपैकी एक भरत जाधव आहेत. नाट्यसृष्टीमध्ये त्यांचं नाव अत्यंत अदबीनं घेतलं जातं. लवकरच त्यांचं नवीन नाटक ‘अस्तित्व’ हे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. याच नाटकाच्या निमित्ताने भरत जाधव ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्टा’वर नुकतेच सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी गाड्यांची हौस का आहे? यामागचं कारण सांगत काही किस्से सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी सासूबाईंनी सुकन्या मोनेंना दिलं होतं खास सरप्राइज; ‘तो’ किस्सा सांगत अभिनेत्री म्हणाल्या…

अभिनेते भरत जाधव म्हणाले, “काम दिसलं की, मी लगेच कर्ज घ्यायचो. माझं कर्ज माहितीये ना, गाड्या घेणं. बाकी काही नाही. माझी खूप इच्छा होती, जेवढ्या गाड्यांच्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यांच्या गाडीचं स्टिअरिंग माझ्या वडिलांच्या हाती असावं. मी ही इच्छा शेवटपर्यंत पूर्ण केली. मग बीएमडब्ल्यू असो किंवा मर्सिडीज असो. अर्थात मी हे सगळं कर्जाने घेतलं. व्हॅनिटी व्हॅनची गरज होती म्हणून ती घेतली. मी कुठलीही गाडी घेतली ती पहिल्यांदा वडिलांचा हातात दिली.”

हेही वाचा – “समारंभपूर्वक लग्न करणं हा माझ्या मते गुन्हा”; संजय मोने यांचं वक्तव्य, म्हणाले…

पुढे भरत जाधव यांनी पहिल्यांदा बीएमडब्ल्यू चालवतानाचा वडिलांचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “आम्ही कोल्हापूरला बीएमडब्ल्यू घेऊन जात होतो. तेव्हा वडील म्हणाले, ‘गाडीला गिअर नाहीये.’ मी म्हटलं, याला गिअर नसतात. ते म्हणाले, ‘ड्रायव्हरला गिअर पाहिजे. गिअरशिवाय ड्रायव्हरला मज्जा नाही.’ मी म्हटलं, ७२ लाखाला घेतली आहे. ते म्हणाले, ‘पैसे चुलीत घालं. त्याला काय महत्त्व आहे? त्यांनी विचार पण केला नाही मी किती रक्कम बोलतोय. आयुष्यभर ते टॅक्सीत होते ना त्यामुळे…”

हेही वाचा – पहिल्यांदा बालकलाकार अर्जुनच्या कॅन्सरग्रस्त आजीला दाखवला होता ‘एकदा काय झालं’ चित्रपट , ‘तो’ प्रसंग सांगत सलील कुलकर्णी म्हणाले…

त्यानंतर भरत यांनी व्हॅनिटी व्हॅन पाहताच वडिलांची काय रिअ‍ॅक्शन होती याचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “व्हॅनिटीसारखी मोठी गाडी पाहिल्यानंतर वडील रडले होते. मी व्हॅनिटीमध्ये त्यांच्या टॅक्सीचा फोटो लावला होता. पण तो कोणाला जास्त दिसत नव्हता. कारण माझे कपडे तिथे ठेवायचो. देवाच्या फोटोप्रमाणे तो फोटो लावला होता. जेणेकरून जाणीव असावी याने आपल्याला भाकरं, पोळी दिलीये. त्यामुळे मी टॅक्सीचा फोटो लावला होता. तो फोटो पाहिल्यावर वडील खूप रडले होते.”

दरम्यान, भरत जाधव यांचं आगामी ‘अस्तित्व’ नाटक ३ नोव्हेंबरपासून सुरू होतं आहे. या नाटकात भरत जाधव यांच्यासह अभिनेत्री चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर ही कलाकार मंडळी आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor bharat jadhav talk about why him like cars pps
Show comments