मालिका असो व चित्रपट अभिनेता देवदत्त नागेने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले. ‘आदिपुरुष’, ‘तानाजी’ या चित्रपटांतही तो काम करताना दिसला. ‘देवयानी’ मालिकेतील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले, तर, जय मल्हार या मालिकेतून तो घराघरांत पोहोचला.

देवदत्त नागे हा काही दाक्षिणात्य चित्रपटांतही काम करताना दिसला. मात्र, तो मराठी चित्रपटांत का दिसत नाही? त्यामागे नेमके कारण काय, यावर त्याने एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे. अभिनेत्याने नुकतीच अमोल परचुरेंच्या ‘कॅचअप’ या पॉडकास्टमध्ये अभिनेत्याने नुकतीच हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याने त्याच्या अभिनयाचा प्रवास, तो आजही अलिबागमध्ये राहण्याला का प्राधान्य देतो, त्याचे त्याच्या गाड्यांवर असलेले प्रेम अशा अनेक बाबींवर वक्तव्य केले आहे.

देवदत्त नागे नेमकं काय म्हणाला?

देवदत्त नागे म्हणाला, “मी संघर्ष नावाचा एक चित्रपट केला. त्यामध्ये तीन हिरो होते. त्यातील मी एक हिरो होतो. त्यातील माझे काही सीन्स कट केले. खूप चांगले भावनिक सीन होते. थोडं वाईट वाटलं. मी जसे अॅक्शन सीन करू शकतो, तसे मी भावनिक सीनही करू शकतो. त्यानंतर मराठी चित्रपट केलाच नाही. मराठी चित्रपटांची प्रतिभा खूप मोठी आहे. श्वाससारखे चित्रपट ऑस्करपर्यंत जातात. किंवा सैराटसारखे चित्रपट खूप गाजतात.

“त्या प्रतिभेपर्यंत पोहोचण्यासाठी ग्रॅज्युएशन करून पीएचडी करायला पाहिजे. कदाचित मराठी चित्रपटसृष्टीतील जे निर्माते आहेत, त्यांना असं वाटत असेल की मी ७-८ वीमध्ये आहे. मी खरंच तिथे आहे. पण मी तिथेपर्यंत पोहोचेन आणि तेव्हा मी त्यांना सांगेन मला आता मराठी चित्रपटात घ्या किंवा कदाचित मी त्यांना परवडत नसेन.”

अभिनेता पुढे म्हणाला की मानधन हा महत्वाचा भाग असतोच. पण, कधीकधी चांगला विषय असेल तर मानधन हा विषय बाजूला ठेवला जातो. बॉलीवूडमधून ज्या ऑफर येतात, त्या काही स्विकारतो. काहींना नकार देतो. शेवटी प्रेक्षकांनी जी जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली आहे, त्या धरुनच या भूमिका स्विकारल्या आणि नाकारल्या जातात. टॉलीवूडमधूनसुद्धा ऑफर येतात. पण, ती खंत आहे. मला मराठीमध्ये काम करायचं आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये मला माझ्या तत्वांवर ते माझं कास्टिंग करतात. मी टेलिव्हिजनवर काम करणं सोडणार नाही. कारण-मला त्याच्यामुळे ओळख मिळाली आहे.