मराठी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या अभिनयानं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदी, मल्याळम या चित्रपटांतही त्यांनी काम केलं आहे. अभिनयाबरोबर त्यांनी लेखन, दिग्दर्शनही केलं आहे. शिवाय हिंदी वेब सीरिजमधल्या गिरीश कुलकर्णी यांच्या भूमिकादेखील चांगल्याच चर्चेत राहिल्या. असे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गिरीश कुलकर्णी मात्र सोशल मीडियाला आपल्यापासून दूरच ठेवतात. ते सोशल मीडियाचा वापर करत नाहीत, असं त्यांनी नुकतंच एका मुलाखतीत स्पष्ट केलं. तसेच त्यांनी यामागचं कारणही सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिले के करीब’ कार्यक्रमात बोलताना गिरीश कुलकर्णी म्हणाले की, “सोशल मीडिया वापराबाबत माझी काही वेगळी मतं आहेत. त्यामुळे मी सोशल मीडियाचा वापर करत नाही. सोशल मीडिया ही खूप अनावश्यक गोष्ट होऊन बसली आहे. अनेकजण अनावश्यकरित्या तिथे व्यक्त होतात. माणसाची अभिव्यक्ती इतकी महत्त्वाची गोष्ट आहे, ती खरी उर्मीतून छान तयार व्हावी आणि मग तुम्ही अभिव्यक्त व्हावं. तुमच्याकडे काही तरी साचायलातर हवं. त्याच्या आधीच तुम्ही उथळपणाने प्रतिक्रियावादी होत चालला आहात. त्याला सोशल मीडियाच कारणीभूत आहे. कारण ते तुम्हाला उसकवतात आणि म्हणतात की, बोला..बोला… पण माझ्याकडे याविषयी बोलण्यासारखं नाहीये. तर मी शांत बसतो, इतरांचं ऐकतो, चिंतन करतो. झाडं, पानं, फुलं पाहतो, काहीही करतो. माझ्या ठायी सोशल मीडियाचा मी एक परिणामकारक विरोध करण्याचा प्रयत्न करतो. मी तिथे अधिक सक्रीय नसतो, ते तुम्ही पाहू शकता.”

हेही वाचा – ‘बाईपण भारी देवा’चा असाही परिणाम! दिग्दर्शक केदार शिंदे गौप्यस्फोट करीत म्हणाले, “आता स्त्रिया मला…”

हेही वाचा – Video: टोमॅटो महागल्यानं राखीनं उचललं ‘हे’ पाऊल; म्हणाली, “आता सात जन्म…”

पुढे ते म्हणाले की, “तसंच मला दुसरं कारण असं वाटतं की, मी एवढा महत्त्वाचा नाहीये. फॉलो वगैरे या कॉन्सेप्टचं पटतं नाही. कोणी कोणाला का फॉलो करावं? आपली वाट आपण शोधायची आहे. फॉलो काय करायचं? मला ही संज्ञाच फसवणूक करणारी वाटते की, फॉलो करा. यामुळे कळप तयार होतात. हे कळप तयार झाल्यामुळेच आजकालची जी सामाजिक, राजकीय हिंसा आहे, माणसामाणसात वाढलेली तेढ आहे, हे सगळं दिसून येत. कारण मीडियावर इतकी गळेकापून स्पर्धा लावली जाते. खरंतर ती काहीच स्पर्धा नसते. पण तुमची माझ्याशी, माझी दुसऱ्याशी अशी सगळ्यांची स्पर्धा लावली जाते. मग त्या स्पर्धकांच्या कळपाची इतरांविरोधात, अशा टोळीवजा गोष्टी होतात. याचं कारण असं की, या मीडियाचा परिणामकारक उपयोग कसा करायचा, त्यातून ज्ञान कसं मिळवायचं, त्याच्यामधून संवाद कसा वाढवायचा याचं कुठलंही प्रशिक्षण आम्हाला दिलं जात नाही. आमच्या शाळा-कॉलेजमध्ये नाहीच आणि कुटुंब व्यवस्थेच्या पातळीवरपण नाही. आई-बाबांना कळत नसतं कसं वापरायचं. पोरं आपलीआपण शिकतात. त्यातून जे निर्माण होत आहे, ते आता दिसून येतंय. बाल गुन्हेगारीसारख्या अनेक गोष्टी त्यातून उद्भवत आहेत. त्यामुळे आता त्याचा समाज म्हणून आपण एकत्रित विचार करायला हवा.”

हेही वाचा – “मला तरी कुठे मिळालंय पारितोषिक?” केदार शिंदेंनी ‘ती’च्यासाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले, “तिची निवड झाली नाही तर…”

“हवंतर त्याचं नीट प्रशिक्षण द्यायला हवं आणि मग त्याचा वापर करावा. असे बरेच लोक आहेत, जे परिणामकारक त्याचा वापर करणारे आहेत. जी शहाणी आहेत, ज्यांना मीडिया कळतं, त्याचं व्याकरण समजून, योग्य पद्धतीनं संवाद साधू पाहतात. पण, त्याच्यामध्ये राजकीय संस्था उतरल्या, तेव्हा त्यांनी त्याचा वापर हत्यार म्हणून करायला सुरुवात केली. चांगलं बोलणारी, चांगली विचार प्रस्तृत करणारी माणसंसुद्धा खच्ची केली जातात. त्यांच्यावर हल्ले होतात, त्यांचे आवाज बंद केले जातात, असं सगळं तिथं घडतंय. अशा व्यासपीठावर जाण्याची माझी तयारी आहे का? मला त्याची गरज वाटते का? आणि मी तेवढा परिपक्व आहे का? असे सगळे प्रश्न तयार होतात. त्यामुळे मी त्याच्यासाठी योग्य नाहीये, असं मला वाटतं. त्यामुळे मी सोशल मीडियाचा वापर करत नाही”, असं स्पष्टच गिरीश कुलकर्णी यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor girish kulkarni dont used social media know reason pps
Show comments