‘हर हर महादेव’ हा मराठीतील बहुचर्चित चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर येत्या २५ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडीओची निर्मिती असलेल्या या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आपल्याला दिसणार आहे. मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाच्या इतर कलाकारांशी हळूहळू ओळख करून दिली जात आहे.
बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत शरद केळकर, तर बाजीप्रभू यांच्या पत्नीच्या भूमिकेत अमृता खानविलकर दिसणार आहे. शिवाय नुकतीच महाराणी सईबाई यांच्या भूमिकेसाठी सायली संजीव हिची वर्णी लागली आहे आणि आता आबाजी विश्वनाथ म्हणून हार्दिक जोशी या गुणी अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे.
आणखी वाचा : बॉलिवूडमध्ये अजय देवगणने सर्वात आधी आणलं VFX; ‘या’ चित्रपटातील गाण्यासाठी वापरलं होतं तंत्रज्ञान
खुद्द सुबोध भावे याने याविषयी सोशल मीडिया अकाऊंटवर माहिती देत या भूमिकेचा एक फोटोही प्रदर्शित केला आहे. सुबोधने याबद्दल पोस्ट करत लिहिलं की, “स्वराज्याच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांना अखेरपर्यंत साथ देणारे चतुर, धाडसी, निष्ठावान साथीदार म्हणजे आबाजी विश्वनाथ. त्यांची भूमिका साकारत आहेत अभिनेते हार्दिक जोशी.स्वराज्याचा शिवमंत्र येत्या दिवाळीत संपूर्ण हिंदुस्थानात घुमणार.”
छोट्या पडद्याच्या माध्यमातून हार्दिक अगदी घराघरात पोहोचला आहे. अजूनही प्रेक्षक त्याला ‘राणादा’ म्हणूनच हाक मारतात आणि त्याची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. त्यामुळे आता या आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक भूमिकेत हार्दिकला बघायला त्याचा चाहतावर्ग चांगलाच उत्सुक आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा पहिला मराठी चित्रपट ५ वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.