वाहतूक कोंडी ही मुंबईतील सर्वात मोठी समस्या आहे. मुंबईकरांना मेट्रो स्थानकांची आणि रस्त्यांची सुरु असलेली कामं यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ट्राफिकमुळे अनेकदा आपण नियोजित स्थळी दिलेल्या वेळेत पोहोचू शकत नाही आणि महत्त्वाची कामेही रखडतात. सामान्य माणसांप्रमाणे मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनादेखील या समस्येचा सामना करावा लागतो.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने नुकताच मुंबईतील वाहतूक कोंडीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मराठी कलाकार प्रामुख्याने मुंबई ते पुणे किंवा गोरेगाव फिल्मसिटी भागात प्रवास करतात. अशावेळी वाहतूक कोंडीमध्ये त्यांचे २ ते ३ तास वाया जातात. यापूर्वी सागर तलशीकर, अभिजीत खांडकेकर, गौतमी देशपांडे या कलाकारांना असा अनुभव आला होता.
अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सिनेक्षेत्रातील त्याच्या कामासह अभिनेता अनेकदा सामाजिक आणि राजकिय परिस्थितीवर पोस्ट करत आपलं परखड मत मांडतो. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर नुकताच वाहतूक कोंडीचा फोटो शेअर केला आहे. यावर हेमंत ढोमे लिहितो, “मुंबई महानगरपालिका सादर करत आहे…ट्राफिक! वेळ रोज अन् स्थळ सर्वत्र!”
हेही वाचा : आदेश बांदेकरांनी शेअर केला ‘होम मिनिस्टर’च्या संपूर्ण टीमचा फोटो, म्हणाले “यांच्यामुळेच…”
दरम्यान, लवकरच हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या झिम्मा चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर अनंत जोग, चैत्राली गुप्ते या कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.