मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून हेमंत ढोमे याला ओळखले जाते. तो कायमच विविध धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. काही महिन्यांपूर्वी त्याचा झिम्मा हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसमध्येही चांगले कलेक्शन केले होते. त्यानंतर आता तो लवकरच सनी हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या या चित्रपटाचे तो जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राजकारणात प्रवेश करणार का? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्याने हटके शब्दात उत्तर दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेमंत ढोमे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो अनेक राजकीय गोष्टींवर बिनधास्तपणे त्याचे मत मांडताना दिसतो. त्यामुळे त्याला राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने फार हटके शब्दात उत्तर दिले.

“मला राजकारणात प्रवेश करायला नक्कीच आवडेल. तो माझ्या आवडीचा भाग आहे. पण सध्या वातावरण तसं नाही. मी हे सगळं प्रचंड फॉलो करत असतो. मला कोणतेही राजकीय प्रश्न विचारले तर त्याचे उत्तर माझ्याकडे आहेत. पण आता तसं वातावरण आजूबाजूला आहे असं मला वाटत नाही. सगळं काही खूप नकारात्मक आहे.

आपण एकटे जाऊन सर्व यंत्रणेत बदल करु शकत नाही. मी आलो की सगळं साफ करुन टाकेन हे बोलायला आणि ऐकायला चित्रपटातील डायलॉगसारखे चांगले वाटते. पण तसं होत नाही. अनेक गोष्टी या ठरलेल्या असतात. त्यामुळे आता तरी मी हे करणार नाही”, असे तो म्हणाला.

हेमंतने ‘सनी’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने याबद्दलचे वक्तव्य केले होते. ‘सनी’ हा चित्रपट येत्या १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस आणि उर्फी काझमी हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत. या चित्रपटात ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख आणि अमेय बर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor hemant dhome talk about may enter into politics nrp