Angelo Mathews Timed Out Against Bangladesh Match : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विश्वचषक स्पर्धेचा ३८ वा सामना बांगलादेश आणि श्रीलंका या संघांमध्ये खेळवण्यात आला. परंतु, या सामन्यादरम्यान अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊटमुळे बाद करण्यात आलं आणि श्रीलंकेची पाचवी विकेट गेली. अशी घटना यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केव्हाच घडली नव्हती. अँजेलो मॅथ्यूज बाद झाल्यानंतर यासंदर्भात क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह मनोरंजन विश्वातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. मराठी अभिनेता हृषिकेश जोशीने या प्रकरणी एक सूचक पोस्ट शेअर केली आहे.
हृषिकेश जोशीने आयुष्यातील एक-एक मिनिट किती महत्त्वाचा आहे हे सांगत अँजेलो मॅथ्यूजच्या तुटलेल्या हेल्मेटचा संदर्भ थेट वाहतुकीच्या नियमांशी जोडला आहे. त्याने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे जाणून घेऊयात…
हेही वाचा : ‘उलगनायगन’ कमल हासन- अभिनयाच्या अथांग महासागरातील अढळ हिमनग
हृषिकेश जोशीची पोस्ट
आउट होण्याचे 10 प्रकार आहेत त्यातले 9 आपण बघितलेत पण, 10व्या नियमाचं उदाहरण कधी बघायला मिळालं नव्हतं. तो पोर्शन आज अँजेलो मॅथ्यूजने पूर्ण केला. हा खेळायला आला आणि हेल्मेटचा बेल्ट लावण्यात वेळ गेला, मग दुसरं मागवलं यात एकही बॉल न खेळता 3 मिनिटं गेली आणि त्याला TIME OUT या नियमात आउट दिले गेले… अँजेलो, अरे येतानाच चांगलं हेल्मेट घालून यायचं रे…. आयुष्यात एकेक मिनिट किती महत्वाचा आहे.
बाबा… आधीच अनेक गावांत हेल्मेट घालत नाहीत, त्यात मुंबईसारख्या शहरात तर पोलीस हमखास पकडतात.. पण 100/200 ची पावती किंवा ऑनलाइन दंड भरून तुमची गाडी जाते तरी पुढं.. पण तुझी ही पावती केवढ्याला फाटली बघ… एकही बॉल न खेळता सिंहली भाषेत शिव्या देत देत आधीच खराब असलेलं तुझं हेल्मेट रागाच्या भरात फेकून द्यावं लागलं तुला.. यातून काय धडा मिळतो की,
1) वेळेचं पालन हा असाही हास्यास्पद विषय ठरतो
आणि
2) बाहेर पडताना हेल्मेट आधीच चेक करून बाहेर पडणे.वाहतूक नियंत्रण, मुंबई पोलीस
यांना समर्पित
हृषिकेश जोशीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, “पोलिसांचे शंभर-दोनशेची पावती फाडायचे दिवस नाही राहिले आता पाचशेच्या पुढंच फाडतात पावती…क्रिकेटमधला हा नियम पहिल्यांदाच ऐकला अनुभवला…” तर, दुसऱ्या एका युजरने, “शाकिबने (बांगलादेश) स्पोर्टमानशिप दाखवायला हवी होती” असं कमेंट्समध्ये म्हटलं आहे. दरम्यान, या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेवर ३ विकेट्सने विजय मिळवला आहे.