२९ जून हा दिवस भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा व आनंदाचा दिवस होता. या दिवशी भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं. या विश्वविजेत्या भारतीय संघाचा आज मुंबईतील वानखेडे मैदानावर गौरव सोहळा आहे. पण त्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचं क्रिकेटप्रेमींनी जोरदार स्वागत केलं आहे. या स्वागतासाठी मरीन ड्राइव्हवर विराट महासागर जमा आहे. विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक पाहून अभिनेता जितेंद्र जोशी भारावून गेला.
‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी संवाद साधताना जितेंद्र जोशी म्हणाला, “खरंतर हे मागच्या वर्षीच अपेक्षित होतं. थोड्याशा फरकाने आपण विजयाला गवसणी घालू शकलो असतो. यावेळेला मात्र सगळ्यांनी कमाल केली. मनापासून सगळ्या भारतीयांचं, सगळ्या क्रिकेटप्रेमींचं आणि भारतीय क्रिकेट टीमचं कौतुक आणि अभिनंदन. हे एक स्वप्न होतं. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी करण्यात आली आहे. पण कोणा एकाच यश नाहीये. संपूर्ण संघाचं यश आहे. म्हणूनच १९८३ नंतर ज्यापद्धतीने म्हणजे धोनीच्या नेतृत्वाखाली आपण वर्ल्डकप जिंकला. पण ही सीरिज ज्या पद्धतीने खेळलीये. म्हणजे विराट कोहलीला शेवटच्या सामन्यापर्यंत सूर गवसत नव्हता पण शेवटच्या सामन्यात ज्या पद्धतीने त्यानं खेळी दाखवली आहे, सूर्यकुमार यादवने ज्या पद्धतीने झेल घेतली, हार्दिक पंड्याची ओव्हर हे सगळं कमालीचं होतं. हे सगळं अवर्णनीय आणि कमाल आहे. हे सगळेजण परत आलेत याचा खूप आनंद आहे. मी टीव्हीवर दृश्य पाहतोय. याही पेक्षा अधिक भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक झालं पाहिजे.”
पुढे अभिनेता म्हणाला, “मी विश्वचषक स्पर्धेमधील आपले सगळे सामने पाहिले आहेत. ज्या पद्धतीने अफगाणिस्तान पुढे चाललं होतं, मला असं वाटतं होतं, अंतिमला पोहोचतायत की काय. पण दक्षिण आफ्रिकेने एकही सामना हरला नव्हता. त्यामुळे ते अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी पात्र होतेच. पण विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना अटी-तटीचा होणार की काय असं वाटलं आणि तसंच झालं. सुदैवाने अंतिम सामन्याच्या दिवशी चित्रीकरणाला सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे अंतिम सामन्यातला प्रत्येक क्षण अनुभवता आला.”
“हा सामना दीर्घकाळ स्मरणात राहिलं. जसं की ८३च्या विजयाबद्दल जुनी-जाणती माणसं बोलतात तेव्हा आपल्याला फक्त ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण माझ्या पिढीने हे आता अनुभवलं आहे. वानखेडेवरचा सामना जेव्हा सचिन तेंडुलकर सरांना उचलून घेतलं होतं तो एक क्षण आणि मागच्या वर्षी जेव्हा अहमदबादला आपण हरलो होतो तो एक क्षण. हे फार दुर्देवी होतं. तेव्हा खूप त्रास झाला होता. खूप राग आला होता. पण ठीक आहे. जुने जाऊ द्या मरणालागुनी असं ते आहे. त्यामुळे जुनं सोडून टाकायचं आता आपण जिंकलोय त्याचा आनंद साजरा केला पाहिजे. हे संपूर्ण श्रेय भारतीय संघातील खेळाडूंचं आहे,” असं जितेंद्र म्हणाला.