आज स्वतंत्र भारताचा ७५वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. सोशल मीडियाद्वारे दिग्गज मंडळींसह कलाकार देशवासियांना प्रजासत्ताक दिनाचा शुभेच्छा देत आहेत. अभिनेता जितेंद्र जोशी याने नुकत्याच अनोख्या अंदाजात प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेता जितेंद्र जोशी हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. फोटो, व्हिडीओ शेअर करण्यापलीकडे तो आपली परखड मत व्यक्त करत असतो. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने नुकतीच त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे. एक व्हिडीओ शेअर करत जितेंद्रने ही पोस्ट लिहिली आहे.
जितेंद्र जोशीने पुण्याच्या एका शाळेतील सफाई करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पहाटे ती व्यक्ती शाळेच्या आजूबाजूचा परिसर साफ करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने लिहिलं आहे, “सकाळी ५.३० वाजता ही व्यक्ती शाळा तयार करते आहे. विद्येने बुध्दी प्राप्त होते आणि ज्ञान संपादन करता येतं. खरं ज्ञान हे की अशी असंख्य माणसं आपल्या कळत नकळत कार्यरत असतात. आपल्यासाठी काम करत असतात. त्यांची आपण दखल घ्यावी आणि त्यांच्यावर प्रेम करावं. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा”
हेही वाचा – Bigg Boss 17 मधून बाहेर पडल्यावर विक्की जैनचं पत्नी अंकिता लोखंडेबद्दल भाष्य; म्हणाला, “तिची खूप…”
अभिनेत्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहतीने लिहिलं आहे, “समाजातील या कष्टकरी व्यक्तींकडे लक्ष देऊन पाहायला आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायला ही एक संवेदशीलता लागते. सर, आपल्याकडे ती आहे. आपण एक उत्तम अभिनेता, लेखक तर आहातच परंतु एक उत्तम व्यक्ती ही आहात, हे पुन्हा एकदा जाणवले.”