सध्या बॉक्स ऑफिसवर कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटाचा बोलबोला सुरू आहे. कबीर खान दिग्दर्शित ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपट १४ जूनला प्रदर्शित झाला होता. आतापर्यंत या चित्रपटाने ३२.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटातील गाणी सध्या ट्रेंड होतं आहेत. याच चित्रपटातील एका गाण्याला प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं आवाज दिल्याच समोर आलं असून त्याचं कौतुक होतं आहे. या मराठी अभिनेत्याने याआधी अजय देवगणच्या सुपरहिट चित्रपटात काम केलं होतं.

मराठी रंगभूमी व सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारा कैलाश वाघमारेनं ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटातील गाणं गायलं आहे. या चित्रपटातील ‘जमूरे’ हे गाणं मेमे खानसह कैलाश वाघमारेनं गायलं आहे. अभिनयात दमदार कामगिरी केल्यानंतर आता कैलाश आपल्या आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.

हेही वाचा – Video: “कालीन भैय्या गॉन, गुड्डू पंडित ऑन…”, बहुचर्चित ‘मिर्झापूर ३’ सीरिजचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना कैलाश वाघमारे म्हणाला, “एका चित्रपटाच्या चित्रीकरणात असताना अचानकपणे मला फोन आला आणि मला गाणं गाण्यासाठी बोलावलं. मला हा सुखद धक्काच होता. ‘सेम सेम बट डिफरेंट’ हे नाटक पृथ्वी थिएटरला पाहिल्यानंतर माझं नाव या गाण्यासाठी सुचवण्यात आलं होतं. गाण्याच्या रेकोर्डिंगच्या वेळी मला कोणत्या चित्रपटाचं गाणं आहे? हिरो कोण आहे? वगैरे कसलीच माहिती नव्हती. पण, पुन्हा एकदा मला त्या टीमनं पुन्हा गाण्याच्या रेकोर्डिंगसाठी बोलावलं. मात्र त्यावेळी मी सिंदखेडराजामध्ये चित्रीकरणात व्यस्त होतो. त्यामुळे रेकोर्डिंगला येणं शक्य होणार नाही असं सांगितले. त्यानंतर मी हे सगळं विसरून गेलो होतो.”

पुढे अभिनेता म्हणाला, “जवळपास दोन महिन्यांपूर्वी गाणं रेकोर्ड केलं आणि विसरुन गेलो. अनेकदा गाणी रेकोर्ड होतात पण ती प्रदर्शित होतात असं नाही. त्यातच प्रीतम यांच्या टीमनं पुन्हा रेकोर्डिंगला बोलावलं होते, पण जाता आलं नाही. अचानकपणे प्रीमियरचे आमंत्रण आलं आणि सुखद धक्का बसला. माझं नाव चित्रपटात गायक म्हणून होतं. प्रीमियरला अनेक दिग्गज मंडळी होती. पण ‘गाभ’च्या प्रमोशनमध्ये मुंबईबाहेर असल्यानं मला प्रीमियरला जाता आलं नाही.” दरम्यान, १५ जूनला ‘जमूरे’ गाण्याचं ऑडिओ व्हर्जन प्रदर्शित झालं होतं. आतापर्यंत या गाण्याला युट्यूबवर ९५ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा – Video: “कसं काय?…” ‘बिग बॉस’ फेम आयशा खानला मराठी भाषेची पडली भुरळ, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “लय भारी…”

याआधी बॉलीवूडमध्ये कैलाशने अजय देवगणच्या ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात काम केलं होतं. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात कैलाशने ‘चुलत्या’ ही भूमिका साकारली होती. ही भूमिका छोटी असली तरी चांगलीच गाजली होती. याशिवाय त्यानं बऱ्याच हिंदी प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे.