किरण गायकवाड हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘लागिर झालं जी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या किरणने अल्पावधीतच मनोरंजनविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘देवमाणूस’ या मालिकेमुळे त्याला लोकप्रियता मिळवून दिली. आता चौक या सिनेमातून किरण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘चौक’ सिनेमाच्या निमित्ताने किरणने आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना त्याने अगदी गमतीशीर उत्तरं दिली. किरणने या मुलाखतीत जन्मतारीख माहीत नसल्याचा खुलासा केला आहे. तो म्हणाला, “एखाद्या चित्रपटाला साजेशी अशीच माझी गोष्ट आहे. म्हणून मी इन्स्टाग्रामच्या बायोमध्येही कहानी पूरी फिल्मी है असं लिहलं आहे. मला माझी जन्मतारीख माहिती नाही.”
हेही वाचा>> “सुंदर मुलगी माझ्या आयुष्यात आली आणि…”, परिणीती चोप्रासाठी राघव चड्ढा यांची खास पोस्ट
किरणने या मुलाखतीत जन्मतारीख ठाऊक नसण्यामागचं कारणंही सांगितलं. “माझा जन्म घरी झाला. घरात मुलगा झाला म्हणून बाबा एक-दोन आठवडे जल्लोषात होते. आई निरक्षर असल्यामुळे तिनेही कुठे नोंद केली नाही. शाळेत प्रवेश घेण्यासाठी जन्मतारखेचा दाखला लागतो. त्यासाठी मग मी आणि आई ससून रुग्णालयात गेलो. तिथून मी जन्माचा दाखला आणला. त्यावर एक तारीख लिहावी लागते म्हणून १२ जून टाकण्यात आली. त्यामुळे माझं नक्षत्र, जन्मतारीख याबद्दल मला काहीच माहीत नाही,” असंही पुढे किरण म्हणाला.
‘चौक’ सिनेमात किरण महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. १९ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात संस्कृती बालगुडे, स्नेहल तरडे, प्रवीण तरडे, शुभांकर एकबोटे, उपेंद्र लिमये हे कलाकारही दिसणार आहेत.