दिग्दर्शक केदार शिंदे यांचा आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट येत्या २८ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर, गाणी हे सर्वच हिट ठरताना दिसत आहेत. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच किरण माने यांनी ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने एक पोस्ट केली आहे. याबरोबर त्यांनी काही फोटोही पोस्ट केले आहेत. यात त्यांनी एक खंतही व्यक्त केली आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात लतादीदी ते बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची नाव समोर, पाहा त्यांची झलक

किरण माने यांची पोस्ट

“…एखादं प्रोजेक्ट तारखांच्या कारणासाठी हातातून गेल्याची चुटपूट लागून रहाते. बिगबाॅस नंतर माझ्याकडे खूप कामे चालून आली याचा आनंद आहेच… आजही, आत्ता ही पोस्ट लिहुन लगेच मी कॅमेर्‍यापुढेच उभा रहाणार आहे… हे साध्य झालं फक्त त्या शो मुळेच ! पण… याआधी बिगबाॅसच्या आणि शुटिंगच्या तारखा क्लॅश झाल्यानं एक छान सिनेमा सोडावा लागला होता.

‘मुलगी झाली हो’ चं शुटिंग करत होतो. अचानक केदार शिंदेचा फोन आला, “किरण, शाहीर साबळेंवर बायोपिक करतोय. त्यातल्या शाहिरांच्या सातारा वास्तव्यातल्या संवादांमध्ये अस्सल सातारी लहेजा, शब्द, बोली हे सगळं यावं यासाठी मला मदत करशील का? तयार असशील तर प्रतिमाताई, तू आणि मी दादरला जिप्सीमध्ये भेटूया. तुला स्क्रिनप्ले देतो.” मी एका क्षणात होकार दिला. फोन ठेवला आणि मन धावत भूतकाळात गेलं… मायणीत…

…चौथी-पाचवीत होतो. वडिलांनी टेपरेकाॅर्डर आणला. सोबत पाचसहा कॅसेटस् होत्या. त्यातल्या काही होत्या शाहीर साबळेंच्या ! ‘बापाचा बाप’, ‘आबुरावाचं लगीन’ अशी लोकनाट्यं त्यात होती. ती ऐकून याड लागलं. अक्षरश: तोंडपाठ केली ती. चारपाच मित्र जमवले.. त्यांनाही हा नाद लावला. मग काय, दर रविवारी आमच्या घरापुढच्या व्हरांड्याचं स्टेज बनवायचं आणि शाहिरांची लोकनाट्य सादर करायची ! आयुष्यातलं पहिलं ‘स्टेज’ , पहिल्या नाटकातला पहिला अभिनय, पहिला प्रेक्षक, अभिनयाचं पहिलंवहिलं कौतुक…हे सगळं सगळं अनुभवायला शाहीरांची ती लोकनाट्यं कारणीभूत ठरली.

अकरावीला काॅलेजसाठी सातार्‍यात आल्यावर जेव्हा-जेव्हा शाहीरांचा कार्यक्रम सातारला असेल तेव्हा कार्यक्रमाच्या आधीच ते जिथं मुक्कामाला असत तिथं पोहोचायचो. तिथं जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवून आशिर्वाद घ्यायचो. लै भारी वाटायचं. मी आजही अभिमानानं सांगतो की, आयुष्यातला पहिला ऑटोग्राफ मी शाहीर साबळेंचा घेतलाय !

…’महाराष्ट्र शाहीर’च्या प्रोसेसमध्ये केदारनं काही काळ का होईना सहभागी करून घेणं, हे माझ्यासाठी किती आनंद देणारं असेल, किती मोलाचं असेल हे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. खरंतर केदार मला या सिनेमात एक छान भुमिकाही देणार होता, पण शुटिंगच्या तारखा आणि बिग बाॅस एकाच वेळी आल्यामुळे ती संधी हुकली.

पण या निमित्तानं मी ज्यांना गुरूस्थानी मानतो अशा शाहीर साबळेंना सलाम करण्याची छोटीशी का होईना संधी मिळाली. सलाम शाहीर, त्रिवार सलाम !!!” , असे किरण माने यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : Video : करंदी, काळं चिकन अन् सोलकढी; सत्या मांजरेकरच्या हॉटेलमधून नीना कुळकर्णींनी ऑर्डर केलं जेवण, म्हणाल्या “पदार्थांची चव…”

दरम्यान ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात सना शिंदे, अभिनेत्री अश्विनी महांगडे, निर्मिती सावंत यांसह अनेक कलाकार हे महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor kiran mane share facebook post for director kedar shinde about maharashtra shahir movie nrp
Show comments