मणिपूरमधील घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. ४ मे रोजी मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यात दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढून त्यांच्यातील एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. हा संपूर्ण प्रकार उघड व्हायला तब्बल ७७ दिवस लागले. मणिपूरमधील हिंसाचाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर याबाबत मराठी कलाविश्वातून अनेक कलाकारांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता कुशल बद्रिकेने महाभारताशी संबंध जोडत या घटनेचा निषेध केला आहे.
हेही वाचा : “मर्द असाल तर मणिपूर फाइल्स चित्रपट बनवा”, युजरने आव्हान दिल्यावर विवेक अग्निहोत्री म्हणाले, “इतका…”
प्रसिद्ध अभिनेता कुशल बद्रिकेने मणिपूरमधील परिस्थितीवर संताप व्यक्त करत इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. कुशल बद्रिके या पोस्टमध्ये लिहितो, “कौरवांनी द्रौपदीचे कपडे काढले खरे पण, लाज निघाली ती पांडवांची…ध्रुतराष्ट्राच्या नजरेने भरलेल्या ह्या समाजाचा मी सुद्धा एक हिस्सा आहे ह्याची मला प्रचंड कीव येते. मी हात जोडून वाट बघतोय श्री कृष्णाची आता त्याने अवतरण्याची गरज आहे. मी निषेध करतो मणिपुर घटनेचा…”
कुशल बद्रिकेच्या पोस्टवर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया देत स्वत:चे मत मांडले आहे. कुशलप्रमाणे यापूर्वी स्वप्नील जोशी, हेमंत ढोमे, सलील कुलकर्णी, रेणुका शहाणे, हेमांगी कवी, अभिज्ञा भावे या कलाकारांनी सुद्धा मणिपूर घटनेसंदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, मणिपूरमधील संतापजनक व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सध्या अनेक ठिकाणी नागरिकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. मराठी कलाविश्वाप्रमाणे बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांनीही या घटनेचा तीव्र निषेध करत संताप व्यक्त केला आहे.