एका किशोरवयीन अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र असलेला ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातून अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगण्यात आली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाबद्दल अभिनेता ललित प्रभाकरने भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ललित प्रभाकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहे. यावेळी त्याने मराठी चित्रपटाबद्दल एक खंतही सांगितली आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : “मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे?” मनसेचा संतप्त सवाल, म्हणाले “दुर्दैवाने, आज ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपट…”

“मी आताच ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा चित्रपट पाहिला. आशिष बेंडे या माझ्या जवळच्या मित्राने तो दिग्दर्शित केला आहे. पण तो माझा मित्र आहे, म्हणून मी हे लाईव्ह करत नाही. मी बऱ्याच वर्षांनी इतका चांगला चित्रपट पाहिला. या चित्रपटानंतर मी मराठी चित्रपटसृष्टीचा भाग असल्याचा मला अभिमान आहे.

आशिष हा माझा मित्र आहे. या चित्रपटाचे सर्व राज्यात, परदेशात आणि ठिकठिकाणी कौतुक होतं आहे. हा चित्रपट संपेपर्यंत आम्ही तो पाहिला. त्यावेळी आम्ही हसलो, एन्जॉय करत होतो. त्यामुळे तुम्ही आवर्जुन हा चित्रपट बघा”, असे आवाहन ललित प्रभाकरने केले.

“आपल्याकडे मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तितका खर्च केला जात नाही. त्यासाठी बजेट मिळत नाही. त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की, आपल्याला एखादी गोष्ट जर आवडली असेल तर ती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने पाहिलाच पाहिजे. त्यामुळे कृपया हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहा. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला एक पैशाचा पश्चात्ताप होणार नाही. एक सेकंदही बोअर होणार नाही”, असेही ललित प्रभाकर म्हणाला.

आणखी वाचा : “या देशाची ओळख जेव्हा…”, नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

दरम्यान ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाचे कथानक शालेय जीवन, वयात येणारा मुलगा, प्रेम आणि त्यानंतर दोन मुलांमधील स्पर्धा या भोवती फिरताना दिसते. हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिष अविनाश बेंडे यांनी केले आहे. या चित्रपटाचे लेखन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor lalit prabhakar share video after watch aatmapamphlet movie instagram post nrp
Show comments