दिग्गज अभिनेते मनोज कुमार(Manoj Kumar) यांचे ४ एप्रिल २०२५ ला निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ५ एप्रिलला मुंबईतील पवन हंश स्मशान येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पत्नी शशी गोस्वामींना अश्रू अनावर झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले. याबरोबरच, बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी हजेरी लावली होती. प्रेम चोप्रा, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक इतर कलाकारांनी हजेरी लावली होती. आता या सगळ्यात मराठी लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे(Mahesh Kothare) यांनी मनोज कुमार यांच्याबरोबर काम करण्याचा एक किस्सा सांगितला आहे.

एक दिवस अचानक…

कोठारे व्हिजन या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये महेश कोठारे म्हणाले, “काल सकाळी बातमी कळली ती जेष्ठ अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन झाले आहे.खूप वाईट वाटलं. कारण-मनोज कुमार या व्यक्तीने मला खूप प्रेरित केलं होतं. त्यांच्या ‘उपकार’ या चित्रपटात मी त्यांच्या लहानपणीची भूमिका केली होती. वास्तविक, त्या काळात माझे आई आणि वडील यांनी कटाक्षाने कोणाचं बालपण करण्याचं टाळलं होतं. त्यावेळेला आम्हाला मनोज कुमार यांच्या प्रॉडक्शन हाऊसमधून या भूमिकेसाठी आम्हाला फोन आला. त्यावेळी आम्ही त्यांना नकार दिला होता. पण गंमत म्हणजे मनोज कुमार यांना मीच हवा होतो. का कुणास ठाऊक? पण त्यांना असं वाटत होतं की मी साधारण त्यांच्यासारखा दिसतो. लहानपणीच्या भूमिकेसाठी मी योग्य असेन. म्हणून त्यांनी मी ही भूमिका करावी म्हणून आग्रह केला. “

महेश कोठारे पुढे म्हणाले, “एक दिवस अचानक मनोज कुमार आमच्या घरी आले. ते लोकप्रिय कलाकार होते. त्यांचे चाहते होते. त्यावेळी आम्ही वरळीला राहत होतो. त्यांनी माझ्या वडिलांची भेट घेतली आणि महेशला ही भूमिका करू द्या, अशी विनंती केली. मनोज कुमार सारखा व्यक्ती घरी आलाय म्हणून आमच्या वडिलांनी मला होकार दिला आणि मी उपकार चित्रपटात मनोज कुमार यांची बालपणीची भूमिका साकारली. त्यावेळच्या शूटिंगच्या आठवणी खूप आहेत. त्यामध्ये त्यांनी प्रमुख नायक म्हणून काम केले होते. ते दिग्दर्शक होते, निर्माता होते. ते पाहून मला कुठे ना कुठेतरी अशी प्रेरणा मिळाली होती की मी यांच्यासारखा निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता व्हावं. शेवटी ते खरं ठरलं. माझं व मनोज कुमार यांचं एक नातं होतं. आज ते आपल्यात नाहीयेत, खूप वाईट वाटेल. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना”, असे म्हणत मनोज कुमार यांच्याकडून मनोरंजनसृष्टीत काम करण्याची प्रेरणा मिळाली होती, अशी आठवण महेश कोठारे यांनी सांगितली.

दरम्यान, मनोज कुमार यांनी अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता म्हणून बॉलीवूडमध्ये काम केले. ते देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांमुळे त्यांना भारत कुमार असेही संबोधले जायचे. त्यांनी ५० वर्षांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये काम केले. त्यांना निधनानंतर मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली आहे.