मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांचं १४ ऑक्टोबरला निधन झालं. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे अनेकांना मोठा धक्का बसला. अतुल परचुरेंना कर्करोग झाला होता. पण, अत्यंत जिद्दीने त्यांनी कर्करोगावर मात करून पुन्हा कामाला लागले होते. त्यांच्या जिद्दीचं खूप कौतुक झालं होतं. परंतु १४ ऑक्टोबरला त्यांची प्राणज्योत मालवली. अतुल परचुरेंना जाऊन आज पाच दिवस झाले आहेत. नुकतीच अभिनेते मिलिंद गवळी यांनी अतुल परचुरेंच्या आठवणीत एक पोस्ट लिहिली आहे; जी सध्या व्हायरल होतं आहे.

मिलिंद गवळींची पोस्ट वाचा…

१४ ऑक्टोबर २०२४ला अतुल परचुरे आपल्याला सोडून गेला, आज आहे १८ ऑक्टोबर २०२४. आज ५वा दिवस, काळ काय कोणासाठी थांबत नाही. पटापट पुढे सरकत असतो. प्रत्येक जण आपापल्या कामाला सुरुवात करतो. जवळची दोन-चार माणसं जी असतात ती कायमची तुटून जातात. त्या माणसाशिवाय कसं जगायचं हा खूप मोठा प्रश्न सतत त्रास देत असतो. अतुल आजारी पडल्यानंतर त्याच्या पत्नीने सोनियाने खूप मोठा लढा दिला. खूप पातळीवर ती लढत होती आणि अगदी भक्कम सावलीसारखी अतुलच्या मागे उभी होती. अक्षरशः मृत्यूच्या दाढेतनं त्याला बाहेर पण काढलं होतं.

अतुल स्वतः खूप मजबूत व्यक्तिमत्त्वाचा होता. तो हुशार होता. त्याचे स्वतःचे ठाम विचार असायचे. स्वावलंबी होता, पण या आजारानंतर तो बिचारा डॉक्टर्स आणि हॉस्पिटलच्या तावडीत असा सापडला की तो हतबल झाला आणि माझ्या अनुभवावरून मला माहिती आहे की एकदा का तुम्ही हॉस्पिटलच्या तावडीत सापडलात, की कितीही स्ट्राँग माणूस असला, तरी हॉस्पिटलमध्ये तो सुन्न होऊन जातो. वेगळ्या वेगळ्या डॉक्टरांच्या प्रयोगानंतर सुद्धा अतुल त्यातून बाहेर आला होता. त्यानंतर आमचं जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्याने त्याचे भयानक अनुभव माझ्याबरोबर शेअर केले होते.

अनेक प्रश्न तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये निर्माण होत असतात, असे आजार, मग डॉक्टर्स, मग हॉस्पिटल, शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, व्यावसायिक प्रश्न. पण अतुल खूप आशावादी होता, परत उभा राहणार, परत भरपूर काम करणार, “इतक्या वर्षात आपण एकत्र काम केलं नाही पण आता नक्की करूया”, पुन्हा कुटुंबासाठी स्वप्न, लेक सखीलसाठी स्वप्न, नियतीच्या मनात काय असतं काहीच सांगता येत नाही. आपल्या हातात हे सगळं स्वीकार करण्यापलीकडे काहीच नसतं. अतुलच्या आईवर, सोनियावर , लेक सखीलवर काय गुजरत असेल. याची कल्पना करता येणार नाही, अतुलची कमी कधीही भरून काढता येणार नाही.

पण “अतुलनीय”ने असंख्य लोकांना असंख्य आनंदाचे क्षण दिलेले आहेत. भाग्यवान आहेत ते ज्यांच्या सानिध्यात अतुल आला होता. त्यांना त्याने खूप साऱ्या सुंदर आठवणी गिफ्ट दिल्या आहेत. अतुलचे विचार खूप छान असायचे, मिश्कील तर तो होताच. शरीराने जरी तो आपल्यात नसला तरी त्याचे विचार, त्याच्या आठवणी आणि कलाकार म्हणून त्याने जे योगदान दिलं आहे ते कायम आपल्या बरोबर राहणार आहे. परमेश्वराकडे प्रार्थना करतो की कुटुंबासाठी आणि समाजासाठी त्यांनी जी स्वप्न पाहिली ती पूर्ण होऊ देत.

हेही वाचा – Bigg Boss 18: हृतिक रोशनची लाइफ कोच सारा अरफीन खान भडकली, स्वतःला मारत म्हणाली, “दोन वेळा गर्भपात अन्…”

हेही वाचा – “बिग बॉस मराठीला तू कलंक होतास”, घनःश्याम दरवडेचा ‘तो’ व्हिडीओ पाहून अभिनेत्रीची प्रतिक्रिया; म्हणाली…

दरम्यान, मिलिंद गवळींच्या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “अगदी मनातून प्रकट झाला आहात”, “खूप सुंदर लिहिलं आहे”, “काही माणसांना आपण भेटत नसलो तरी ती जवळची वाटतात त्यातलाच एक अतुल दादा…देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.