मराठीमध्ये आजवर राजकीय, सामाजिक अशा अनेक विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाले. काही चित्रपट कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहणारे ठरले. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘सिंहासन’. १९७९ साली प्रदर्शित झालेला ‘सिंहासन’ चित्रपट कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाला आता ४४ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचनिमित्ताने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला शरद पवार, जब्बार पटेल, नाना पाटेकर, मोहन आगाशे, सुप्रिया सुळे अशा अनेक दिग्गजांची उपस्थिती दर्शवली होती. दरम्यान ‘सिंहासन’ चित्रपटाच्यावेळी नेमकं काय घडलं? चित्रपटादरम्यानचे किस्से उपस्थितांनी सांगितले. शिवाय नाना पाटेकर यांनीही या चित्रपटादरम्यानची एक आठवण सांगितली.
नाना पाटेकर म्हणाले, “जब्बार पटेल यांनी मला त्यावेळी तीन हजार रुपये दिले होते. तेव्हा शंभर रुपयांमध्ये चार जणांचं रेशन भरलं जात होतं. यादरम्यानची एक वाईट आठवण आहे. मी या चित्रपटामध्ये जयराम हर्डीकर यांना मारतो. या चित्रपटानंतर लगेचच त्यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं”.
आणखी वाचा – “शेतीच करत राहिलो असतो तर…” ‘सैराट’नंतर तानाजी गालगुंडेने केली पायाची सर्जरी, म्हणाला, “माझे दोन्ही पाय…”
“त्यामुळे जयराम हर्डीकर यांच्या पत्नी कित्येक वर्ष माझ्याशी बोलत नव्हत्या. याने चित्रपटामध्ये अपशकुन केला, त्याला मारलं म्हणून माझ्या नवऱ्याचं निधन झालं असं कित्येक वर्ष त्या म्हणत होत्या. त्यानंतर खूप वर्षांनी जयराम हर्डीकर यांच्या पत्नीने माझी भेट घेतली. माझ्याशी संवाद साधला. पण या चित्रपटानंतर मला खूप चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली”. नाना पाटेकरांनी यावेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला.