महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे धक्कादायक वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे चांगलंच राजकारण तापलं आहे. अभिनेते व कवी किशोर कदम सौमित्र यांनीही फेसबूक पोस्ट करत भिडेंच्या अटकेची मागणी केली आहे.
“अजित पवारांना उपमुख्यमंत्री करत भिडे वृत्तीच्या माणसांना बोलतं करून अजित पवारांना हतबल करत राहणं हा राजकारणाचा भाग आहे. आपण सगळेच या राजकारणामुळे कोंडीत सापडलो आहोत. आता हा मुद्दा शिंदेजी आणि अजितजी कसे हाताळतात हा नसून माननीय फडणवीसजी या दोघांची मजा बघत बसणार नाहीत अशी अपेक्षा आहे. तसं नसेल तर तात्काळ संभाजी नव्हे, मनोहर भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला अटक करावी अशी मी एक कलावंत म्हणून मागणी करीत आहे,” अशी पोस्ट किशोर कदम सौमित्र यांनी केली आहे.
दरम्यान, मनोहर भिडेंच्या वक्तव्यामुळे शुक्रवारी (२८ जुलै) विधानसभेत विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली होती. तर भिडे हे भाजपाचं पिल्लू असल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं होतं.