प्रसाद ओक सध्या मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. प्रसादने आपल्या अभिनयबरोबरच दिग्दर्शनातूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. असा या बहुआयामी अभिनेत्याचे येत्या वर्षात अनेक चित्रपट पाहायला मिळणार आहेत. ‘धर्मवीर २’, ‘वडापाव’, ‘जिलबी’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘महापरिनिर्वाण’ असे बरेच प्रसादचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अशातच प्रसादने सरत्या वर्षा अखेरीस चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.
अभिनेता प्रसाद ओक सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयी चाहत्यांना माहित देत असतो. तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण देखील शेअर करत असतो. नुकतीच प्रसादने एक पोस्ट केली आहे, ज्यामधून त्याने चाहत्यांबरोबर वर्षाच्या अखेरीसची नवी सुरुवात शेअर केली आहे.
हेही वाचा – Video: ‘पारू’, ‘शिवा’नंतर ‘झी मराठी’ने आणखी एका मालिकेची केली घोषणा, प्रोमो आला समोर
प्रसादने एक रील शेअर केला आहे. ज्यामध्ये तो खांद्याला बॅग लावून चालताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अॅनिमल फाइड बेजीएम म्युझिक लावली आहे. हा रील शेअर करत प्रसादने लिहिलं आहे, “वर्षाच्या अखेरीस नवी सुरुवात…नवा चित्रपट ‘रीलस्टार’…भूषण मंजुळे, अनंत महादेवन, रुचिरा जाधव या सगळ्यांबरोबर…” ‘रीलस्टार’ या प्रसादच्या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन रॉबिन/ सिम्मी हे करत आहेत.
अभिनेत्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रसादला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिलं आहे, “प्रसाद दादा एका गोष्टीबद्दल तुमचे कुतूहल वाटते कारण ‘धर्मवीर २’चे शूट चालू आहे. ‘महापरिनिर्वाण’चे देखील असावे. शिवाय हास्यजत्रामध्ये तुम्ही परीक्षक आहात आणि आता हा चित्रपट मग तुम्ही तुमच्या वेळेचे नियोजन कसे करता आणि त्यासाठी लागणारी एनर्जी सुद्धा..”, तसेच इतर चाहत्यांनी ‘ऑल बेस्ट सर’ लिहित प्रसादला शुभेच्छा दिल्या आहेत.