सध्या सोशल मीडिया हे एक महत्त्वाचं माध्यम झालं आहे. आजकाल सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या आधारे इन्फ्लुएन्सर्सना मालिका, चित्रपटात कामाची संधी दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवरून लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकने आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.
प्रसाद ओक, हे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या नावांपैकी एक नाव आहे. प्रसादने आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळी छाप उमटवली आहे. अभिनयाबरोबर प्रसाद उत्कृष्ट दिग्दर्शक आहे. येत्या काळात त्याचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अशातच प्रसाद नुकत्याच सुरू झालेल्या ‘कॉकटेल स्टुडिओ’च्या ‘इनसाइडर्स’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी त्याने इन्फ्लुएन्सर्सना अॅक्टर्स समजण्याबाबत स्पष्ट मत मांडलं.
हेही वाचा – Video: ‘सुख कळले’नंतर ‘कलर्स मराठी’च्या नव्या मालिकेची घोषणा; रश्मी अनपट, रेशम टिपणीससह झळकणार ‘हे’ कलाकार
प्रसादला विचारलं की, इन्फ्लुएन्सर्सना आता अॅक्टर्स समजलं जातंय यावर तुझं मत काय? अभिनेता म्हणाला, “दुर्दैवी आहे. अत्यंत थर्ड क्लास क्राइटेरिया की ज्यांचे फॉलोअर्स जास्त तो चांगला किंवा मोठा अॅक्टर्स आहे, असं म्हणणं. हा हिंदीवाल्यांनी आणलेला ट्रेंड आहे; जो मराठीत रुजू पाहतोय. पण तो वेळीच ठेचला गेला पाहिजे आणि तो ठेचला जाईलच. जोपर्यंत मराठीमध्ये परेश मोकाशी, आदित्य सरपोतदार, प्रवीण तरडे, मी स्वतः, रवी जाधव, विजू माने, अभिजीत पानसे अशी अनेक नावं घेता येतील माझ्या सहकारी मित्रांची जे परफॉर्मन्सवर विश्वास ठेवणारे दिग्दर्शक आहेत. तोपर्यंत फॉलोअर्सच्या कॅटगिरीचा मराठीत काही फार फरक पडेल किंवा त्याने काही खूप मोठा बदल होईल असं मला वाटतं नाही. हिंदीवाले ते करतायत. पण अखेर तो अॅक्टर्स म्हणून कसा आहे हे कळल्यानंतर ते स्वतः त्याला अनफॉलो करत असतील असं मला वाटतंय.”
दरम्यान, प्रसादच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो ६ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात प्रसाद नामदेव व्हटकर यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याशिवाय ‘गुलकंद’, ‘धर्मवीर २’, ‘जिलबी’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘वडापाव’ या चित्रपटांमध्ये प्रसाद विविधांगी भूमिकेत दिसणार आहे. ‘पठ्ठे बापूराव’, ‘वडापाव’ या चित्रपटांमध्ये प्रसाद अभिनयासह दिग्दर्शनांची धुरा सांभाळत आहे. प्रसादचे हे सर्व चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.