अभिनेता प्रसाद ओक मराठी मनोरंजसृष्टीतला लोकप्रिय अभिनेता आहे. अभिनयाबरोबरच प्रसाद एक उत्तम दिग्दर्शकही आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने दिग्दर्शित केलेला ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाची क्रेझ अजूनही चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. भाऊबीजेनिमित्त प्रसादने आनंद दिघेंवर आधारित एक पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा- मिताली मयेकरने नवरा सिद्धार्थला पाडव्याचे दिले ‘हे’ महागडे गिफ्ट; किंमत किती आहे माहीत आहे का?
भाऊबीजेनिमित्त प्रसादने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघे यांच्या लूकमधला त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोबरोबर प्रसादने दिलेली कॅप्शनही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. फोटो पोस्ट करीत त्याने लिहिलं, “भाऊबीजेच्या सणाचा उत्साह असाच कायम राहावा. प्रत्येक बहिणीच्या पाठीशी आनंद दिघेंसारखा भाऊ असावा.” प्रसाद ओकची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केली आहे.
प्रसादच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर आतापर्यंत त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेय. सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे परीक्षण करीत आहे. आता लवरकच ‘धर्मवीर’ चित्रपटाचा दुसरा भाग ‘धर्मवीर २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसाद ओकच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. सध्या या चित्रपटाच शूटिंग सुरू आहे. तसेच प्रसादचा ‘जिलबी’ नावाचा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे.