२२ जानेवारी २०२४ हा संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक दिवस होता. कारण या दिवशी अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन झालं आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. या क्षणाची संपूर्ण भारतीय आतुरतेने वाटत पाहत होते. २२ जानेवारीला अयोध्येत मोठ्या उत्साहात, जल्लोषात राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी, साधुसंतांनी हजेरी लावली होती. नुकतंच मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता प्रसाद ओकने आपल्या कुटुंबासह रामलल्लाचं दर्शन घेतलं. प्रसादची पत्नी मंजिरी ओकने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे; जो चांगलाच चर्चेत आला आहे.
मंजिरी ओकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ‘महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’पासून ते राम मंदिरातील दर्शनापर्यंतचा प्रवास पाहायला मिळत आहे. यावेळी प्रसाद व मंजिरीसह त्यांची दोन मुलं सार्थक ओक आणि मयांक ओक देखील आहेत.
अयोध्येतील रामलल्लाचं दर्शन घेतल्याचा आनंद प्रसाद, मंजिरी, सार्थक, मयांक यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. मंजिरीने शेअर केलेल्या व्हिडीओवर प्रसादने ‘जय श्री राम’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसादच्या आधी गेल्या महिन्यात अभिनेता स्वप्नील जोशीने रामलल्लाचं दर्शन घेतलं होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
हेही वाचा – “एका कलाकाराशी लग्न करताना…”, ‘पारू’ फेम अभिनेत्याच्या लग्नाला झाली सहा वर्षे, खास पोस्ट करत म्हणाला…
दरम्यान, प्रसाद ओकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याचे आगामी काळात बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ६ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटात तो झळकणार आहे. या चित्रपटात प्रसाद नामदेव व्हटकर यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याशिवाय ‘गुलकंद’, ‘धर्मवीर २’, ‘जिलबी’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘वडापाव’ या चित्रपटांमध्ये प्रसाद विविधांगी भूमिकेत दिसणार आहे. ‘पठ्ठे बापूराव’, ‘वडापाव’ या चित्रपटांमध्ये प्रसाद अभिनयासह दिग्दर्शनांची धुरा सांभाळत आहे. प्रसादच्या चाहत्यांसाठी येत्या काळ पर्वणीचा असणार आहे.