मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीत एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, अनुजा साठे, सौरभ गोखले, क्षिती जोग, अमेय वाघ, जितेंद्र जोशी, शशांक केतकर, वैदेही परशुरामी अशा अनेक मराठी कलाकारांनी हिंदीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे आजकाल हिंदी चित्रपट, वेब सीरिजमध्ये मराठी कलाकार सर्रास पाहायला मिळतात. अशातच मराठीतील आघाडीचा अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकने हिंदीत काम न करण्यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे.
नुकत्याच सुरू झालेल्या ‘कॉकटेल स्टुडिओ’ या युट्यूब चॅनलच्या ‘इनसाइडर्स’ कार्यक्रमात प्रसाद ओक सहभागी झाला होता. यावेळी प्रसादला विचारलं की, तीन हिंदी चित्रपट केल्यानंतर पुन्हा हिंदीत काम का नाही केलं? यावर अभिनेता म्हणाला, “सध्याची परिस्थिती अशी आहे की मी आता मराठीत अभिनेता व दिग्दर्शक म्हणून ज्या पद्धतीचं काम करतोय. त्यात मी प्रचंड आनंदी आहे. हे सगळं सोडून किंवा या सगळ्याला डावलून हिंदीमध्ये जायचं, काहीतरी दुय्यम भूमिका करायच्या. बरं हिंदीत खूप पैसे मिळतात असं मी बऱ्याचदा ऐकलं. पण वस्तुस्थिती तशी नाहीये. माझी काही वेब सीरिजसाठी निवड झाली होती. पण पैसे ऐकल्यानंतर मी विचार केला की, सात ते आठ पटीने पैसे मराठीत मिळतायत. दहा पट म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. इतक्या कमी पैशात मी दुय्यम भूमिका करायची, कशासाठी? म्हणजे काहीच कारण नाही. त्यांना मराठीतले कलाकार हवेत. कारण मराठीतील कलाकार बापच आहेत, याच्यात काही दुमत नाही किंवा शंका नाही. त्यांच्या रिटेक्सचा वेळ वाचतो. मराठी कलाकारांचं पाठांतर फार अप्रतिम असतं. नाटकातून ते आले असल्यामुळे खणखणीत टेक देतात. त्यांना दुसऱ्या टेकची गरज नसते. या सगळ्या गोष्टीचा फायदा त्यांना होता. पण कलाकाराचा देखील फायदा झाला पाहिजे ना? त्या हिशोबाने तुम्ही मानधनही द्यायला पाहिजे. तिथे तुम्ही म्हणता, मराठी कलाकारांना एवढे पैसे कुठून देणार? तर नाही करायचं काम. जिथे मला उत्तम मान मिळेल आणि उत्तम पैसे मिळतील तिथे मी काम करेनच.”
हेही वाचा – ‘बाईपण भारी देवा’पेक्षा ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई, जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
पुढे प्रसाद म्हणाला, “देवाच्या पाठिंब्याने, आशीर्वादाने आतापर्यंत १०० चित्रपट पूर्ण झाले आहेत. ‘वडापाव’ हा माझा १००वा चित्रपट आहे. हा १००वा चित्रपट असल्यामुळे मी पहिल्यांदा दिग्दर्शन करून अभिनयाचं काम केलं. नाहीतर मी ज्या चित्रपटाचं दिग्दर्शन करतो त्यात मी शक्यतो काम करत नाही. ‘कच्चा लिंबू’ चित्रपटात मी काम केलं नाही. माझ्या ‘भद्रकाली’ची घोषणा झाली आहे. ‘पेठ्ठ बापूराव’ची घोषणा झालीये. हे दोन्ही चित्रपट दिग्दर्शित करतोय. ‘पेठ्ठ बापूराव’मध्ये मी स्वतः कामही करतोय. ‘महापरिनिर्वाण’ सारखा मोठा चित्रपट येऊ घातलाय. ‘जिलबी’सारखा वेगळ्या वाटेवरचा चित्रपट केला आहे.”
हेही वाचा – Video: जेव्हा माधुरी दीक्षितला ‘आंटी’ म्हणून मारली हाक, अभिनेत्रीची होती ‘ही’ प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल
“‘मीरा’ नावाचा एक अत्यंत वेगळा चित्रपट केलाय; ज्याच्यात मी एका डॉक्टराची भूमिका केलीये. तो डॉक्टर म्युझिक थेरपीने रुग्णांना बरं करत असतो. अशी थेरपी अस्तित्वात आहे. ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न म्हणजे ‘मीरा’ चित्रपट आहे. त्यामुळे अत्यंत वेगळ्या वाटेवरचे, वेगवेगळ्या विषयांवरचे, वेगवेगळ्या भूमिका असलेले उत्तम चित्रपट मी मराठीत अभिनेता, दिग्दर्शक म्हणून करतोय. तर या सगळ्याला बाजूला ठेवायचं आणि हिंदी जायचं. हिरोच्या मागचा एक इंस्पेक्टर किंवा कोणीतरी एक असिस्टंट अशा भूमिकांमध्ये मला अजिबात रस नाही. मला काहीच वाटतं नाही. माझं चाललंय ते उत्तम चाललं आहे. जेव्हा माझ्या नशीबात असेल हिंदीतली उत्तम भूमिका आणि उत्तम पैसे तेव्हा आपोआप येईल. माझा नशीबावर खूप विश्वास आहे. कारण माझा कष्टांवर खूप विश्वास आहे. मी प्रामाणिकपणे कष्ट करत राहिलो म्हणून ९० चित्रपटानंतर का होईना एक ‘धर्मवीर’सारखा सुपरहिट चित्रपट माझ्या आयुष्यात आला. दुसरा ‘चंद्रमुखी’सारखा सुपरहिट चित्रपट आयुष्यात आला. बराच वेळ लागला पण आला. हरकत नाही अजून थोडा वेळ लागले. मात्र हिंदीत काहीतरी होईल,” असं प्रसाद म्हणाला.