मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब अखेर लग्नबंधनात अडकला. अनेक दिवसांपासून प्रथमेशच्या लग्नाची चर्चा सुरू होती. अखेर काल (२४ फेब्रुवारी) त्याने प्रेयसी क्षितिजा घोसाळकरबरोबर लग्नगाठ बांधली. जवळचे नातेवाईक व मित्र-परिवाराच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, या लग्नात क्षितिजा व प्रथमेच्या लूकची चर्चा चांगलीच रंगली होती. लग्नात क्षितिजाने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी आणि त्यावर गुलाबी रंगााचा शेला घेतला होता. तर, प्रथमेशने पांढऱ्या रंगाचा सदरा आणि गुलाबी रंगाचे धोतर परिधान केले होते. तसेच त्याने गुलाबी व पिवळ्या रंगाचा फेटाही बांधला होता. या लूकमध्ये दोघे खूप सुंदर दिसत होते.
मात्र, या सगळ्यात लक्ष वेधून घेतले ते क्षितिजाच्या मंगळसूत्राने. क्षितिजाचे मंगळसूत्र आधुनिक दिसत असले तरी त्याला पारंपरिक पद्धतीचा टच देण्यात आला आहे. आधुनिक डिझाईन असलेल्या तिच्या मंगळसूत्रात काळे मणीही ओवण्यात आले आहेत. क्षितिजाच्या मंगळसूत्रात पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतींचा मिलाफ होता. तसेच तिच्या छोट्या मंगळसूत्रात Infinity चे चिन्हही आहे. अनेकांनी हे मंगळसूत्र आवडले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
प्रथमेश व क्षितिजाची इन्स्टाग्रामवर पहिल्यांदा ओळख झाली. १४ फेब्रुवारी २०२० ला क्षितिजाने व्हॅलेंटाईन डेनिमित्त एक फोटोशूटची सीरिज केली होती. ही सीरिज बघून प्रथमेशने क्षितिजाला पहिल्यांदा मेसेज केला होता. त्यानंतर हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आता नुकतीच दोघांनी लग्नगाठ बांधत नव्या आय़ुष्याला सुरुवात केली आहे.