Marathi Bhasha Gaurav Din 2025 : आज सर्वत्र ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जात आहे. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर जगाच्या कानकोपऱ्यात आजचा दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सोशल मीडियामाध्यमातून मराठी कलाकार मंडळी चाहत्यांना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. अभिनेता प्रथमेश परब व पत्नी क्षितिजा घोसाळकरने थायलंडमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला. याचा व्हिडीओ नुकताच क्षितीजाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचा आज जन्मदिवस आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात कुसुमाग्रज यांचं मोलाचं योगदान आहे. मराठी भाषेला ज्ञानभाषा म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले होते. त्यामुळे आज कुसुमाग्रज यांच्या स्मृतीला अभिवादन आणि मातृभाषेचा गौरव करण्यासाठी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो. यानिमित्ताने प्रथमेश व क्षितीजाने मराठमोळा लूक करत थायलंडमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला. याचा व्हिडीओ शेअर करत क्षितिजाने सुंदर पोस्ट लिहिली आहे.
जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या थायलंडमधून हार्दिक शुभेच्छा…मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर आपल्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि ओळखीचा एक अभिमानास्पद भाग आहे. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलो तरी मराठी माणसाचं हृदय मात्र नेहमीच मायभूमीकडे ओढ घेत असतं.
परदेशात गेल्यावर सुरुवातीला सर्व काही नवीन वाटतं. संस्कृती, भाषा, खाद्यसंस्कृती आणि लोकांचे विचार. मात्र, जसे जसे दिवस जातात, तसतसे आपल्या मातृभाषेची ओढ लागते. मराठीची आठवण वेगवेगळ्या गोष्टींमधून सतत येत राहते. परदेशात जर एखादा मराठी माणूस भेटला, तर आनंदाला पारावार उरत नाही. ‘तुम्ही कुठून?’ एवढं विचारलं तरी गप्पांना सुरुवात होते आणि परदेशातही मराठीपण जिवंत वाटू लागते.
परदेशात वेगळी भाषा वापरण्याची गरज असली तरी मनातल्या मनात मराठीचाच विचार सुरू असतो. एखादं इंग्रजी वाक्य बोलताना मध्येच “अहो, काय सांगू!” , “हे लोक काय बोलतात काहीच कळतं नाही!”, “बघूया काय होतं” असं सहज सुटतं आणि आपण आपल्या मातृभाषेशी किती घट्ट जोडलेलो आहोत याची जाणीव होते.
परदेशात असलो तरी मराठी भाषेत बोलताना जो आनंद मिळतो, तो कोणत्याही भाषेत मिळू शकत नाही. म्हणूनच आपण कुठेही असलो तरी आपल्या भाषेवर प्रेम करूया, तिचा आदर करूया आणि पुढच्या पिढीपर्यंत तिचं वारसा हक्कानं जतन करूया. जय महाराष्ट्र!
क्षितिजा घोसाळकरच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दोघांना चाहत्यांनी ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहे. प्रथमेश व क्षितीजाचा थायलंडमधला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.