मराठी मनोरंजनसृष्टीत सशक्त अभिनेते म्हणून ओळखले जाणारे मंगेश देसाईंनी नाटक, चित्रपट व मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. ‘खेळ मांडला’ यांसारख्या संवेदनशील चित्रपटात त्यांनी उत्तम काम केलं आहे. मंगेश देसाई यांनी निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. नुकतेच ते अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांच्या युट्यूब चॅनेलवरील ‘दिल के करीब’ कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी मंगेश यांनी त्यांच्या आडनावामागचं रहस्य सांगितलं.
मंगेश देसाई म्हणाले की, “माझ्या कुटुंबात मी फक्त देसाई आडनाव लावतो. बाकी सर्वजण देशपांडे आडनाव लावतात. ते सगळे देशपांडे आहेत, मी एकटाच फक्त देसाई आहे.” यावर सुलेखा तळवलकर यांनी विचारलं की, ‘हे कसं काय?’
हेही वाचा – “…म्हणून क्रांती नाव ठेवलं”; अभिनेत्रीनं स्वतः सांगितला यामागचा किस्सा
त्यानंतर मंगेश म्हणाले की, “जेव्हा माझ्या शाळेत अॅडमिशन होतं. तेव्हा मला वडिलांनी बोलावलं. मला अजूनही तो दिवस आठवतोय. ते मला म्हणाले, हे बघ ही तीन-चार आडनावं आहेत. देसाई, देशमाने आणि अजून एक काहीतरी आडनाव होतं. या तिन्हीपैकी तुला कुठलं आवडलं?, असं त्यांनी मला विचारलं. तर मी म्हटलं, देसाई. तर ते म्हणाले, ठीक आहे. तुझं आडनाव आता देसाई.”
हेही वाचा – “…याचं शल्य मनात नक्कीच आहे”; केदार शिंदेंच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष, म्हणाले, “सैराट….”
“मग मला नंतर कळालं की, देसाई ही आमच्या गावाकडची पदवी आहे. ती वंशात कोणीतरी वापरायची असते. म्हणून त्यांनी (वडिलांनी) देसाई हे आडनाव पहिल्या नंबरला ठेवलं होतं आणि तेचं मला आवडलं होतं. त्यामुळे मी देसाई आहे. बाकी सगळे देशपांडे आहेत आणि आता माझा मुलगाही देसाई आहे,” असा मंगेश देसाई यांनी त्यांच्या आडनावामागचा किस्सा सांगितला.