Actor Pushkar Jog Reaction On Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. पहलगाम येथील बैसरन पर्वत रांगेच्या खोऱ्यात दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर बेछूट गोळीबार केल्याची घटना २२ एप्रिलला घडली.

पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध केला जात आहे. याप्रकरणी भारतासह जगभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बॉलीवूडसह मराठी कलाकारांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत या दहशतवाद्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेता पुष्कर जोगने या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे अभिनेत्याने ICC आणि BCCI ला एक महत्त्वपूर्ण विनंती केली आहे. अभिनेता लिहितो, “मी आयसीसी (ICC) आणि बीसीसीआयला (BCCI) विनंती करतो की, यापुढे पाकिस्तानबरोबर कोणत्याही द्विपक्षीय मालिका किंवा आयसीसी सामन्यांचं आयोजन करू नये. जरी यातून सर्वांना आर्थिक फायदा होणार असेल तरीही त्यांच्याबरोबर या मालिका खेळू नयेत. आता पुरे झालं… आपल्या सैनिकांचं, अधिकाऱ्यांचं आणि सामान्य लोकांच्या आयुष्याचं महत्त्व किती मोठं आहे हे पटवून देणं.. ही आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे. जय हिंद, जय भारत!”

“आपण हिंदू आणि मुस्लीम सर्वजण एक आहोत आणि आपण दहशतवादाविरुद्ध एकत्र लढू आणि एकजुटीने उभे राहू. #Peace” असं पुष्करने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. पुष्करप्रमाणे समीर परांजपे, प्रथमेश परब, सुव्रत जोशी, शिवानी रांगोळे, मेघा धाडे अशा अनेक मराठी कलाकारांनी सविस्तर पोस्ट लिहित या घटनेविषयी संताप व्यक्त केला आहे.

पुष्कर जोगची प्रतिक्रिया ( Pushkar Jog Reaction On Pahalgam Terror Attack )

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारने सुद्धा तातडीने बैठका घेऊन या दहशतवादी हल्ल्याविरोधात कठोर पाऊल उचलत पाच मोठे निर्णय घेतले आहेत. याद्वारे केंद्र सरकारकडून १९६० चा सिंधू पाणी करारही स्थगित करण्यात आला आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांना पुढील ४८ तासांत भारत सोडावा लागणार आहे.