‘जबरदस्त’ चित्रपटामुळे अभिनेता पुष्कर जोग घराघरांत लोकप्रिय झाला. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘बिग बॉस’मराठी या शोमुळे पुष्करला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुसाफिरा’ चित्रपटाच्या माध्यमातून पुष्कर एक निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला. यादरम्यान त्याने अनेकदा मराठी चित्रपटांना ऑस्करमध्ये स्थान द्यायची इच्छा बोलून दाखवली होती. नुकतीच त्याने भार्गवी चिरमुलेच्या गप्पा मस्ती पॉडकास्टमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी पुष्करने अनेक विषयांवर आपलं स्पष्ट मत मांडलं.
मराठी इंडस्ट्रीबद्दल बोलताना पुष्कर म्हणाला, “अनेकजण मला म्हणतात तू ‘मुसाफिरा’, ‘धर्मा AI’ अशा धाटणीचे चित्रपट का करतोस? पण, मला अशाचप्रकारचे चित्रपट करायला आवडतात. मला माझ्या मराठी चित्रपटांना खूप मोठं झालेलं बघायचंय. माझ्या मराठी चित्रपटांसाठी मला राष्ट्रीय पुरस्कार जिंकायचे आहेत. मला ऑस्करमध्ये जाऊन मराठी बोलायचंय. तिथे मला ‘जय हिंद जय महाराष्ट्र’ म्हणायचं आहे आणि मी हे करून दाखवणार! हा माझा माज नाहीये…ही तळमळ…माझ्या मनातली एक इच्छा आहे. आज माझ्याकडे जे काही आहे ते सगळं माझ्या मराठी चाहत्यांमुळे आहे. मी हे सगळं बोलताना नेहमीच भावुक होतो पण, हाच माझा स्वभाव आहे.”
इंडस्ट्रीबद्दल सांगताना पुष्कर पुढे म्हणाला, “मराठी इंडस्ट्रीमध्ये अजिबात एकजूट नाही. एका मराठी माणसाचं चांगलं झालेलं दुसऱ्याला आवडत नाही. आज आपल्याच इंडस्ट्रीत जे लोक म्हणतात ना… मराठीसाठी हे आणि मराठीसाठी ते…हेच लोक सगळ्यात जास्त ग्रुपिंग आणि लॉबिंग करतात. याला काम नाही द्यायचं असं ठरवतात. पण, एखाद्याला काम का नाही द्यायचं? या सगळ्या समस्या आहेत. मला कोणाचीही साथ नाही, पण मी आपल्या चित्रपटांसाठी नक्की मेहनत करणार…आज माझं वय ३८ आहे. अजून माझ्याकडे १२ वर्षे आहेत. या पुढच्या १२ वर्षांत मला राष्ट्रीय पुरस्कार आणि माझ्या मराठी चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार जिंकायचाय अशी माझी मनापासून इच्छा आहे. हा अतिआत्मविश्वास किंवा माज अजिबातच नाही.”
“आपली मराठी इंडस्ट्री खऱ्या अर्थाने एकत्र आली तर, बाकीच्या कोणत्याच इंडस्ट्री राहणार नाहीत. कारण, आपल्यासारखं टॅलेंट कुठेच नाही. प्रत्येकजण इथे भारी काम करतंय पण, युनिटी नाही. पण, इथे काय होतंय चित्रपट प्रदर्शित होण्याआधी आपण एकमेकांना फोन करत नाही. सारख्या तारखांना चित्रपट प्रदर्शित करतो, एकमेकांसाठी कधीच पोस्ट करत नाही. यामुळे बॉलीवूडमध्ये मराठी कलाकारांना पाण्यात बघितलं जातं. माझ्या इंडस्ट्रीबद्दल मी नेहमीच तळमळीने बोलत असतो. जोपर्यंत आपल्यात एकजूट होणार नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही.” असं स्पष्ट मत पुष्कर जोगने मांडलं आहे.