गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर पापाराझींना चुकीच्या पद्धतीने फोटो काढू नका असं सतत सांगत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या अभिनेत्री तिच्या ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या दरम्यान जान्हवीने अनेकवेळा पापाराझींना चुकीच्या अँगलने फोटो काढू नका असं सांगितलं. तिच्याप्रमाणे याआधी मृणाल ठाकूर, हिना खान, पलक तिवारी यांनी देखील पापाराझींच्या चुकीच्या अँगलने फोटो काढण्यावर नाराजी दर्शवली होती. आता याबद्दल मराठी अभिनेता पुष्कर जोगने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता अशा तिन्ही जबाबदाऱ्या सांभाळणारा लोकप्रिय अभिनेता म्हणून पुष्कर जोगला ओळखलं जातं. तो सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. मनोरंजनसृष्टीसह अनेक सामाजिक विषयांवर अभिनेता आपली परखड मतं मांडत असतो. पापाराझी कॅमेरामन महिला कलाकारांचे चुकीच्या अँगलने फोटो काढतात याबाबत आता पुष्कर जोगने आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
हेही वाचा : होणारा पती सिद्धार्थ नव्हे तर अदिती राव हैदरीला आवडतो ‘हा’ बॉलीवूड अभिनेता; १३ वर्षांपूर्वी केलंय एकत्र काम
“पापाराझींनी महिला कलाकारांचे मागून किंवा चुकीच्या पद्धतीने फोटो/व्हिडीओ काढणं थांबवलं पाहिजे. जर संबंधित महिला कलाकार अशाप्रकारचे फोटो काढल्यावर अस्वस्थ होत असतील तर, कृपया त्यांचा आदर करा. हे खरंच खूप बेसिक मॅनर्स आहेत. प्रत्येकाच्या मतांचा सन्मान करणं खूप गरजेचं आहे. #जोगबोलणार” अशी पोस्ट शेअर करत पुष्कर जोगने आपलं मत मांडलं आहे. तसेच “हे बरोबर आहे का? हो किंवा नाही” असा पोलही अभिनेत्याने या स्टोरीमध्ये घेतला आहे.
दरम्यान, पुष्कर जोगच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘बिग बॉस’ मराठी कार्यक्रमामुळे तो घराघरांत लोकप्रिय झाला. त्याने आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘मुसाफिरा’ चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटात पुष्कर जोग, पूजा सावंत, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी व पुष्कराज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.