कलाकारांना कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी अधिकाधिक मेहनत करावी लागते. काही मंडळी आपलं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरतात. तर काहींचं अभिनयक्षेत्रामध्ये काम करण्याचं स्वप्न अपूर्णच राहतं. मात्र अभिनेता पुष्कर जोगने कलाक्षेत्रामध्ये करिअर करण्याचा निश्चय केला आणि त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. मात्रे हे सगळं करत असताना त्याला अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला.
‘बिग बॉस मराठी’मध्ये पुष्कर सहभागी झाला होता. या शोमुळे त्याला अधिक लोकप्रियता मिळाली. त्याने काही मराठी चित्रपटांमध्येही विविध भूमिका साकारल्या आहेत. पण अभिनयक्षेत्रामध्ये काम करणं त्याच्यासाठी काही सोप नव्हतं. त्याला यासाठी बरीच मेहनत करावी लागली. तसेच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्याला अनेक कठीण प्रसंगांचाही सामना करावा लागला.
सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल से करीब’ या कार्यक्रमात पुष्करने हजेरी लावली होती. यावेळी त्याने अनेक गोष्टींबाबत भाष्य केलं. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मिळालेल्या वाईट वागणूकीबाबत पुष्करने खुलासा केला. तो म्हणाला, “‘बिग बॉस मराठी’ या शोमुळे मला लोक ओळखायला लागले. या शोपूर्वीही मला लोक ओळखत होते. पण त्यावेळी माझ्याबाबत बरंच बोललं गेलं. फक्त दोन ते तीन वर्षच हा या क्षेत्रामध्ये टिकू शकतो असं बोललं जायचं. माझ्या तोंडावर लोक हे बोलत होते. कारण आपल्या क्षेत्रात एखाद्याचा अशाप्रकारेच अपमान केला जातो”.
“जेव्हा आपण कामासाठी फिरत असतो किंवा काम मिळत नाही तेव्हा अशाप्रकारची टीका करण्यात येते. गेल्या वर्षी माझे चार चित्रपट प्रदर्शित झाले. चारही चित्रपट ओटीटीवर आले. तरीही लोक माझ्यावर जळतात. आता माझ्यावर लोक जळतात आणि मला टोमणे मारतात. पण आधी असं नव्हतं. मला खोचकपणे बोललं जायचं. याच्या वडिलांजवळ खूप पैसे होते आणि ते पैसे आता हा उडवत आहे असंही लोकांनी मला म्हटलं आहे. पण प्रत्यक्षात मी तसा नाही आहे. खऱ्या आयुष्यात मला माझ्या वडिलांनी नेहमीच जमिनीवर पाय ठेऊनच राहायला शिकवलं. मला पैसे आणि माणसांची किंमत आहे”. पुष्कर आता मराठीमधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो.