काही दिवसांपूर्वी अभिनेता चिन्मय मांडलेकरला मुलाच्या जहांगीर नावावरून ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगमुळे चिन्मयने मोठा निर्णय घेतला. यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही, असं त्याने जाहीर केलं. तसंच अभिनेत्री क्षिती जोगला देखील ट्रोल करण्यात आलं होतं. मंगळसूत्रावरील विधानावरून क्षितीला ट्रोल केलं होतं. याशिवाय इतर कलाकारांना देखील सध्या ट्रोल करण्याचं प्रमाण वाढलं आहे. यावरच अभिनेता पुष्कर श्रोत्री भडकला आणि म्हणाला, “आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ट्रोलर्सच्या टोळीला नेस्ताबूत करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे.”
‘तारांगण’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी संवाद साधताना पुष्कर श्रोत्रीला विचारलं की, ट्रोलिंगमुळे अस्वस्थ व्हायला होतं का? यावर अभिनेता म्हणाला, “मी कायम खूप अस्वस्थ होतो. क्षिती ओक आमच्या मैत्रीणीला देखील खूप त्रास झाला होता. म्हणजे ट्रोलिंग करण्याची पद्धत आणि ती भाषा ही तुम्हाला अस्वस्थ करणारी आहे. आपल्याला खरंच असं कधी कधी वाटतं हे खरे प्रेक्षक आहेत का? पण माझं असं म्हणणं की, क्षिती जोग किंवा चिन्मयला ज्या पद्धतीने ट्रोल करणारी जी माणसं होती, त्यांची भाषा बघता ती सगळी फेक अकाउंट होती. त्यामुळे ज्यांना चेहराच नाही त्यांना आपण उत्तर का द्यायचं? जर ते खरे असतील आणि त्यांना खरा चेहरा लोकांसमोर आणायचा असेल तर त्यांनी चिन्मयला भेटायला यावं, क्षितीला भेटायला यावं आणि नाराजी व्यक्त करावी. तुम्ही असे छुप्या पद्धतीने, खोटे अकाउंट्स ओपन करून खोटे चेहेरे लावून तुम्ही वाटेल ते बोलाल तर आम्ही ऐकून घेणार नाहीच आहोत. आम्ही तुम्हाला किंमतही देत नाही. आमच्या दृष्टीने तुम्ही नगण्य आहात. तुम्ही कोणीच नाही आहात. कारण तुमचं अस्तित्वचं नाहीये. सगळी सोशल मीडियावरची ट्रोलर्सची अकाउंट आहेत ती सगळी खोटी आहेत. नावं खोटी आहेत, फोटो खोटे आहेत. तुम्हाला जर तुमचं खरं अस्तित्व दाखवण्याची तुमच्यात हिंमत नाही आणि चिन्मय किंवा क्षितीला त्यांनी हे करावं, ते करावं सांगण्याची गरज नाही.”
हेही वाचा – नऊ महिन्यातच ‘ही’ लोकप्रिय मालिका गाशा गुंडाळणार! ‘या’ दिवशी शेवटचा भाग प्रदर्शित होणार
पुढे पुष्कर म्हणाला, “चिन्मयने आधीच सांगितलं होतं, त्याने त्याच्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं होतं. त्यामुळे उद्या तुम्ही जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये पण जाणार नाही आहात का? त्याचं नाव जहांगीर आहे म्हणून, असं नाही होतं. जर तुमच्यात एवढी हिंमत आहे तर तुम्ही सैफ अली खानला म्हणता का तू नाव तैमूर कसं ठेवलंस? आम्ही तुझा एकही चित्रपट बघणार नाही, असं म्हणता? तर नाही म्हणत. हिंमत का नाही दाखवतं? मी बिंबासरमध्ये राहायचो. तर बिंबासारमध्ये राहणाऱ्या एका गृहस्थाचं नाव दुर्योधन होतं. मग काय करायचं? त्याच्या मुलांनी समजा उद्या अभिनय करायचा ठरवला तर त्यांनी उद्या ‘महाभारत’ मालिकेत काम नाही करायचं, कारण त्यांच्या वडिलाचं नाव दुर्योधन आहे म्हणून. असं नसतं. त्याचा काही संबंध नसतो. कलाकार चांगला असतो. कलाकार आवडणारा असतो किंवा कलाकार आवडतो पण त्याचं काम आवडत नाही. हे व्यक्ती सापेक्ष आहे.”
हेही वाचा – रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड म्हणणाऱ्याला गौरव मोरेचं सडेतोड उत्तर, म्हणाला, “हिंमत असेल तर…”
“चिन्मय त्या ट्रोलिंग किती त्रस्त झाला असेल. एवढ्या मोठ्या ट्रोमामधून त्याला जावं लागलं असेल. चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही हा निर्णय उद्वेग आहे. चिन्मय उत्तम अभिनेता आहे. तो एक सजग कलाकार आहे. आजूबाजूच्या परिस्थितीवर वेळोवेळी भाष्य करणारा, आजूबाजूच्या बदलत्या परिस्थितीनुरूप तो आपल्या मुलांच्या संस्कारांमध्ये बदल करणारा आहे. तो त्याचा मुलांना संस्कार देत असताना तू जहांगीर आहेस तर अमूक कर आणि जहांगीर नसशील तर तमूक कर असं नाहीये ना. तो त्याला याच देशातले भारतीय संस्कृतीतले संस्कार देतोय ना. त्या मुलाच संगोपनही तसंच करतोय. तो इतका सजग कलावंत आहे. या गोष्टीमुळे खजील झाला आहे, निराश झाला आहे, त्यामुळे त्याने हे पाऊल उचललं आहे. मला खरंच मनापासून वाटतं की, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ट्रोलर्सच्या टोळीला नेस्ताबूत करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. खोटी अकाउंटस्, खोटे चेहेरे, कोणी यावं काहीही बोलावं, लपून दगड मारणारे असतात त्यांना काही महत्त्व नाही. जर तुला लढायची हिंमत असेल ना समोर ये, तुझा खरा चेहरा लोकांनाही कळू दे, म्हणणं लोकांना कळतंय ना तुझं, मग चेहराही लोकांना कळू दे,” असं स्पष्टच पुष्कर श्रोत्री म्हणाला.
पुढे अभिनेता म्हणाला, “थोड्या फार फरकाने सगळ्यांच्या बाबतीत हे घडतंय. वाईट काय वाटतंय माहितीये ना, नावाबद्दल जेव्हा तुम्ही ट्रोलिंग करताय तेव्हा तुम्ही आम्हाला अनुसरुण ट्रोलिंग करत नाही आहात. इतिहासाला धरून ट्रोलिंग करत नाही आहात. त्याच्या बायकोच्या, मुलाच्या चारित्र्याबद्दल बोललं जातंय, हे अत्यंत घाणेरडं आहे. ही आपली भारतीय संस्कृती निश्चित नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही बोलताय, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्यावरती हे संस्कार केले नाहीत. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी देऊन परत पाठवणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांचे आपण अंश आहोत, असं आपण मानतो. एखाद्या परस्त्रीला, एखाद्या पुरुषाला त्याच्या चारित्र्याबद्दल इतक्या हिन दर्जाची किळसवाणी अशा कमेंट करू नयेत. तुम्हीच स्वतःला बघा आरशात आणि विचारा आपण खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत का?”