मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते राजन पाटील हे मराठी कलाविश्वातील नावाजलेलं नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून ते अनेक गंभीर आजारांचा सामना करत आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी माझी मृत्यूशी चाललेली लढाई मी थांबवत आहे. मी शस्त्र टाकली आहेत…, असं म्हणत एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आता त्यांनी एक पोस्ट शेअर करत त्यांच्या आजारांबद्दल सांगितले आहे.
राजन पाटील यांनी फेसबुकवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आता त्यांनी अभिनय क्षेत्राबद्दल भाष्य केले आहे. त्यावेळी त्यांनी त्यांच्या शस्त्रक्रिया, आजारपण आणि त्यामुळे त्यांची झालेली अवस्था याबद्दल एक पोस्ट केली आहे.
आणखी वाचा : “नितीन देसाईंची घटना, राजकारण्यानी बुडवलेले पैसे अन्…”, प्रसिद्ध मराठी सेलिब्रेटी फोटोग्राफरच्या जिवाला धोका, म्हणाला “त्याच्याबद्दल काही पुरावे…”
राजन पाटील यांची पोस्ट
“नमस्कार मंडळी. काल दिनांक 13 .08.2023 रोजी दिवसभरात तुम्ही सर्वांनी माझ्या वाढदिवसाची आठवण ठेवून माझं अभिष्टचिंतन करून माझ्यावरचं प्रेम व्यक्त केलंत याबद्दल मी तुमचा निरंतर ऋणी आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक याद्वारे शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद यांचा वर्षाव झाला. अनेकांनी प्रत्यक्ष फोन करून शुभेच्छा दिल्या. काही जणांचे फोन मी घेऊ शकलो नाही. क्षमस्व.
तर मंडळी, काल मी वयाची सत्तरी पूर्ण केली. आणि एकाहत्तराव्या वर्षात पदार्पण केले. आता तुम्ही म्हणाल, त्यात काय विशेष. तुमचं खरंय. यात माझं कर्तृत्व नाहीच. पण इतर काहींचं नक्की आहे.सर्वप्रथम माझं कुटुंब. माझे आई वडील, भावंडं, चाळीतले शेजारी, ‘ मुंशिपालटी ‘ ची प्राथमिक शाळा … यांच्या सहवासात माझा पिंड पोसला गेला. आपण बरोबर असू तर कोणालाही घाबरायचे नाही, हा गुण ( की दुर्गुण ?) अंगी बाणलाच नाही तर मुरला. नंतर कालपरत्वे घरं बदलली, शाळा बदलल्या, नंतर रुपारेल कॉलेज. तिथे अभिनयाच्या आवडीला प्रोत्साहन मिळाले. लहानसहान नोकऱ्या केल्या. नंतर टाइम्स ऑफ इंडियाला जॉईन झालो. तिथे एक नवीन क्षेत्र मिळाले. कामगार युनियन. तिघेही युनियनचा जनरल सेक्रेटरी झालो. तिथे विरुध्द युनियन होतीच. त्यामुळे मारामारी, पोलिस, लॉकप, कोर्ट कचेऱ्या हे ओघाने आलेच. परिणामी नोकरी गेली. मधल्या काळात माझे लग्न झाले. उजुसारखी मला माझ्या गुणदोषांसकट स्वीकारणारी, सांभाळणारी पत्नी मिळाली. ती आजही मला सांभाळतेय.
टाइम्स मधील नोकरी गेल्यानंतर मी माझ्या आवडत्या अभिनय क्षेत्रात स्वतःला झोकून दिले. सुदैवाने लोकांनी मला अभिनेता म्हणून स्वीकारले. डॉ. लागू, प्रा. मधुकर तोरडमल, विक्रम गोखले, अशा मोठ्या रंगकर्मी बरोबर काम करून त्यांची शाबासकी मिळवली. रसिकांचं उदंड प्रेम मिळालं, ज्याचं मोल नाही करता येणार. या व्यवसायाने मला प्रसिद्धी मिळाली. मराठी दूरदर्शन मालिकांमुळे मी लोकांच्या घराघरात पोहचलो. स्टार नाही झालो पण सुजाण, संवेदनशील अभिनेता म्हणून माझी ओळख निर्माण झाली. आणखी काय हवं !
आयुष्याच्या या प्रवासात माझ्या प्रकृतीवर खूप आघात झाले. गूढ ( ज्याचं कारण किंवा नाव मला अद्यापही माहीत नाही ) आजार, पोलिओ, टायफॉइड, कॅन्सर, अनेक रस्ता अपघातांमुळे झालेली हाडांची मोडतोड अशा अनेक आजारांशी लढलो आणि त्यांना पिटाळून लावले. आतापर्यंत माझी अकरा ऑपरेशन्स झाली आहेत. म्हणजे गंमत बघा मी फक्त नाटकाच्या थिएटरवर प्रेम केलं असं नाही तर तितकेच प्रेम ऑपरेशन थिएटरवर सुद्धा केले. आता गेली दहा वर्षे मी पार्किन्सन्स या आजाराशी लढतोय. लढाई कठीण आहे. पण लढणे हा माझा हक्क आहे, माझा स्वभाव आहे. या लढाईत तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांची मला गरज आहे. त्या तुमच्याकडून मिळतील याची मला खात्री आहे. गेली तीन वर्षं माझ्या अभिनयाच्या क्षेत्रापासून मी दूर आहे. पाण्याविना तडफडणाऱ्या माश्यासारखी माझी अवस्था झालीय. पुन्हा कार्यरत होण्याची जबरदस्त इच्छा आहे. बघुया…
कौटुंबिक पातळीवरही मी समाधानी आहे. पत्नी उजू आता माझी आई झालीय. माझी खूप काळजी घेते. म्हणजे मी जागेवर पडून वगैरे नाहीय, हिंडता फिरता आहे. पण औषधांचा प्रभाव आहे तोपर्यंत. तो प्रभाव ओसरला की नंतर काही खरे नाही. पण मी त्याची काळजी करत नाही. ….. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मुलगा, मुलगी , सून, जावई, माझा भाऊ, बहीण, माझी नातवंडे सदैव माझी काळजी घेतात. हे सुख आणि समाधान सगळ्यांच्या नशिबात नसते.
माझ्या या आजारपणामुळे एक गोष्ट झाली. मला आपलं कोण हे समजले. जे माझे आहेत असे मला वाटत होते ते लोक हळूहळू दूर झाले आणि जे खरंच माझे आहेत ते अधिक जवळ आले. अर्थात याबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही. असा मी, राजन पाटील. तुम्हाला माझ्याविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तर माझी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत, रंग माझा आणि माझी माणसं, ती वाचा. ती तुम्हाला नक्की आवडतील”, असे राजन पाटील यांनी यात म्हटले आहे.
दरम्यान, राजन पाटील हे मराठी कलाविश्वातील नावाजलेलं नाव आहे. अभिनयासोबतच ते उत्तम लेखकदेखील आहेत. रंग माझा, माझ माणसं ही पुस्तक त्यांनी लिहिली आहेत. त्याबरोबरच रायगडाला जेव्हा जाग येते, तोची एक समर्थ, तरुण तुर्क म्हातारे अर्क, मित्र, शर्यत, बरड, मुंबई आमचीच अशा अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये ते झळकले.