अभिनेता रितेश देशमुख मराठी बरोबरच हिंदी मनोरंजनसृष्टीतही लोकप्रिय आहे. रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कपल आहेत. १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ३ फेब्रुवारी २०१२ रोजी ते विवाहबंधनात अडकले. मात्र लग्नानंतर कित्येक वर्षांनी रितेशने त्याच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा केला आहे.
रितेश देशमुखने नुकंतच ‘मुंबई तक’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने वेड चित्रपट, जिनिलिया, विलासराव देशमुख यांच्यासह विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी रितेश देशमुखला “राजकारण की सिनेसृष्टी, तुमचं पहिलं प्रेम काय?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्याने फारच खास पद्धतीने उत्तर दिले.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार २५ वर्षांपूर्वी कसे दिसायचे? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
“मी खरं सांगू का तर माझं पहिलं प्रेम राजकारण आहे. मला राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नाही. पण ते माझं निश्चितच पहिलं प्रेम आहे. मी त्या घराण्यात वावरलो आहे, त्यामुळे आजूबाजूला काय घडतंय, कशा गोष्टी घडतात, याची जाणीव ठेवणं, त्यामुळे ते कायमच माझं पहिलं प्रेम असेल आणि असणार. ते अपुरं प्रेम आहे, असंही मी म्हणू शकत नाही. ते प्रेम पुर्ण व्हावं अशीही इच्छा नव्हती. पण राजकारणाबद्दल प्रेम आणि आपुलकी हे कायमच असेल.” असे रितेशने म्हटले.
‘अमित देशमुख, धीरज देशमुख हे दोघेही आमदार आहेत. मग तुम्हाला खासदार किंवा मंत्री होण्याची इच्छा आहे का?’ असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला. त्यावर रितेश म्हणाला, “अजिबात नाही. घराणेशाहीचा वाद आता यापुढे नको. त्यामुळे माझं जे काही स्वप्न आहे, ते मी चित्रपटात पात्राद्वारे साकारेन. ते फार सोप्प आहे.”
आणखी वाचा : “नोकराच्या भूमिकेचा शिक्का पडला की…” वनिता खरातने सांगितले हिंदी चित्रपटात काम न करण्याचे कारण
‘तुम्ही कधीच भविष्यात राजकारणात जाणार नाही का’, असे रितेशला विचारले असता तो म्हणाला, “भविष्यात काय होईल, याची मला कल्पना नाही. मला अभिनेता व्हायचं नव्हतं. मला ती संधी मिळाली आणि मी अभिनेता झालो. गेली २० वर्ष मी यात काम करतो, लोकांनी प्रेम दिलं, म्हणून मी अजून आहे. मी जे काम करतो, त्यात माझं हृदय आहे आणि तेच काम मी मरेपर्यंत करावं अशी माझी इच्छा आहे.”
दरम्यान रितेश देशमुख हा अभिनेता असला तरी तो महाराष्ट्राच्या राजकीय घराण्यात जन्मलेला आहे. त्याचे वडील दिवंगत नेते विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्याबरोबर रितेश देशमुखचा मोठा भाऊ अमित देशमुख आणि धाकटा भाऊ धिरज देशमुख हे दोघेही राज्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. पण रितेशने मनोरंजन क्षेत्राची निवड करत यशस्वी करिअर केले आहे.