अभिनेता संदीप पाठक फक्त अभिनेता म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही उत्तम आहे. याचच एक उदाहरण म्हणजे गेल्या काही महिन्यांपूर्वी श्रीरामपूर ते मुंबई प्रवासादरम्यान रस्त्यालगतच्या एका छोट्या दुकानामध्ये संदीप थांबला. या दुकानातील दुकानदाराला त्याने स्वतः वेफर तळायला मदत केली. त्याच्या या कृतीचं बरंच कौतुकही झालं. आताही संदीपचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – “मी साडेचार वर्षांपूर्वी डेटवर…”, प्राजक्ता माळीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा
संदीपने चित्रीकरणासाठी निघालेला असतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. प्रवासादरम्यान संदीपची एका आजीशी भेट होते. गावाच्या मुख्य रस्त्याने आपल्या कामासाठी निघालेल्या संदीपच्या गाडीला ही आजी हात दाखवते. गावची एसटी चुकल्यामुळे संदीप या आजीला त्याच्या गाडीमधून तिला हवं त्या ठिकाणी नेऊन सोडतो.
संदीपने केलेली मदत पाहून आजीला अश्रू अनावर होतात. यावेळी ती आजी म्हणते, “मला माझ्या मुलाची आठवण आली. काही महिन्यांपूर्वीच त्याचा अपघात झाला. बाबा यापुढेही अशीच ओळख ठेव”. “मला तुमचाच मुलगा माना” असं संदीप यावेळी त्या आजीला म्हणतो. संदीपचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
“चित्रीकरणासाठी जात असताना ही गोड आजी भेटली. प्रवासात तिच्याबरोबर गप्पा झाल्या. आजीचे आशिर्वाद मिळाले अजून काय हवं” असं संदीपने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. संदीपचं नेटकरीही भरभरुन कौतुक करत आहेत. तुम्ही ग्रेट आहात, मराठी माणूस कितीही मोठा झाला तरी मदतीला धावून येतो, माणुसकी जपणारे संदीप पाठक अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून केल्या आहेत.