उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर अभिनेता संदीप पाठकने मनोरंजन विश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. संदीपने साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याला ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत अभिनेता संदीप पाठकने रंगभूमी, मराठी नाटक, कलाकार याबाबत भाष्य केले आहे.
हेही वाचा : मराठा सैन्याची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर! ‘फौज’ चित्रपटाची घोषणा, पोस्टरने वेधले लक्ष
संदीप पाठकने ‘अल्ट्रा मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत मराठी रंगभूमीचे आणि कलाकरांचे भरभरून कौतुक केले. अभिनेता म्हणाला, “टेलिव्हिजन शो करताना आपल्याला सेटवर रोज तीच लोकं पुन्हा भेटतात पण, नाटक करताना आपण दौऱ्यावर असतो रोज वेगवेगळ्या लोकांना भेटतो. नाटक ही जिवंत कला आहे, प्रेक्षकांची दाद सुद्धा समोरासमोर मिळते म्हणून मला नाटक करणं जास्त आवडतं.”
संदीप पुढे म्हणाला, “‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ आणि इतर नाटकांमुळे मी आयुष्यात एवढा मोठा झालो. मी असं नेहमी म्हणतो की, आईने मला ‘माणूस’ म्हणून आणि रंगभूमीने मला ‘नट’ म्हणून जन्म दिला. त्यामुळे रंगभूमी माझ्या सर्वात जवळची आहे.”
हेही वाचा : प्राजक्ता गायकवाडने दिली गुडन्यूज, पदवी परीक्षेत मिळाले इतके गुण
“जर आज आपण ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ किंवा ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ पाहिले तर आपल्याला एक लक्षात येईल की, मराठी रंगभूमी जगात सर्वात अव्वल आहे. नाटकांचे सगळे रेकॉर्ड्स मराठी रंगभूमीच्या नावे आहेत. प्रशांत दामले यामध्ये टॉपला आहेत. यामध्ये आमच्या ‘वऱ्हाड…’ नाटकाचा रेकॉर्ड आहे. ‘सही रे सही’ आता ५ हजार प्रयोगांकडे जातंय म्हणजे त्यांचा वेगळा रेकॉर्ड होईल. ‘ऑल द बेस्ट’, ‘यदा कदाचित’ ही नाटकं सुद्धा आहेत. त्यामुळे मराठी रंगभूमी आणि ही नाटकं आपल्यासाठी मानाचं पान आहे.” असे संदीर पाठकने सांगितले.