अभिनेता संदीप पाठक फक्त अभिनेता म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही उत्तम आहे. मध्यंतरी श्रीरामपूर ते मुंबई प्रवासादरम्यान रस्त्यालगतच्या एका छोट्या दुकानामध्ये तो थांबला. या दुकानातील दुकानदाराला त्याने स्वतः वेफर तळायला मदत केली. अगदी सामान्य व्यक्तींप्रमाणेच तो स्वतःला मानतो. याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आताही त्याने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – भावाच्या लग्नात प्राजक्ता माळीचीच हवा, नव्या वहिनीचं केलं जोरदार स्वागत, फोटो शेअर करत म्हणाली…
पुण्यातील भोसरीमध्ये संदीपने एका रक्तदान शिबिराला हजेरी लावली होती. तेथील रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना तो भेटला. यादरम्यानचा एक व्हिडीओ संदीपने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
फक्त पुण्यातच नव्हे तर इचलकरंजी, सांगली, खोपोली सारख्या शहरांमध्येही आपल्या टीमच्या सहाय्याने संदीप रक्तदान शिबिराचं आयोजन करणार आहे. तो स्वतः या ठिकाणी हजेरी लावणार आहे. पुण्यातही सकल मराठा परिवाराच्या सहाय्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये जवळपास २००पेक्षा अधिक लोकांनी रक्तदान केलं.
हा व्हिडीओ शेअर करताना संदीप म्हणाला, “चला, रक्ताचं नातं जोडूया. सध्या महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा भासत आहे, रक्ताची खूप गरज आहे, सकल मराठा परिवार या ग्रुपने हे शिबीर आयोजित केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. २१५ रक्तदत्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांचेही आभार.” संदीपचा हा व्हिडीओ पाहता चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.