मराठी मनोरंजन विश्वात आपल्या खुमासदार लेखणीने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे संजय मोने. नाटक, मालिका, चित्रपट या माध्यमांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. किस्से सांगण्यात त्यांचा विशेष हातखंडा आहे. नुकतच ते पत्नी, अभिनेत्री सुकन्या मोने यांच्यासह ‘लोकमत फिल्मी’च्या ‘लव्ह गेम लोचा’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी लग्न समारंभाने करणं हा माझ्या मते गुन्हा असं वक्तव्य केलं. नेमकं ते काय म्हणाले? जाणून घ्या…
संजय मोने स्वतःच्या लग्नाविषयी सांगत असताना म्हणाले, “समारंभपूर्वक लग्न करणं हा माझ्या मते गुन्हा आहे. कारण १०० लोकांना बोलावलेलं असतं, त्यातले ७० लोकं येतात. उरलेल्या ३० लोकांचं जेवण फुकट जात. शेवटी काय होतं, कुठल्याही माणसाचं लग्न झाल्यानंतर आपल्याला लक्षात काय राहतं. त्याच लग्न आठवत? म्हणजे काय… बटाट्याच्या भाजीला मीठचं नव्हतं. अरे त्यांचा संसार कसा चाललाय? काय चाललंय? त्यामुळे मला असं वाटतं. समारंभाने लग्न करूच नये. ज्याच्याकडे लपवण्यासाठी पैसा आहे, ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत, त्यांनी ते करावं.”
“माझ्या लग्नात मी स्वतः बघितलं होतं, जेमतेम पाच ते सहा माणसांचं अन्न उरलं होतं. पुन्हा जर आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं, तर मी असं सांगणार कोणीही येऊ नका. आम्ही आमच्यासाठी करतोय. तुम्हाला वाटलं तुम्ही तुमच्या घरी जेवा. त्याचं मला बिल पाठवा. पण लग्नाला येऊ नका. आता तर ते हळद, मेहंदी…. मला हे आवडत नाही. आपल्याकडे लग्नाच्या विधीपूर्वी ग्रहमक होतं. ते उत्तर भारतात असतं का? नाही ना. मग आपण कशाला ती मेहंदी करायची?,” असं स्पष्टच संजय मोने म्हणाले.