अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये संकर्षणचं आवर्जुन नाव घेतलं जातं. अभिनया व्यतिरिक्त संकर्षणच्या कविता आणि त्याचं उत्कृष्ट सूत्रसंचालन या गोष्टी प्रेक्षकांना खूप आवडतात. सध्या अभिनेत्याचं ‘तू म्हणशील तसं’ नाटक आणि ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. अशातच संकर्षणने नुकत्याच केलेल्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टमधून संकर्षणने कोल्हापुरातील महालक्ष्मीच्या मंदिरात आलेल्या अनुभव चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. दैनंदिन जीवनात येणारा अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. नुकताच त्याने कोल्हापुरच्या महालक्ष्मीच्या मंदिरात आलेला अनुभव सांगितला. संकर्षणने महालक्ष्मीच्या मंदिराबाहेरील काही फोटो पोस्ट करत लिहिल की, सुप्रभात, आज पहाटे २.३० पासूनचा अनुभव… कार्तिक मासामध्ये महालक्ष्मी देवीच्या; अंबाबाईच्या नित्योपचारात बदल होतो…पहाटे २.३० वाजता मंदिर उघडते आणि काकड सुरू होतो. मशाल घेऊन देवीच्या कळसापासून कापूर लावण्यास सुरुवात होते ते गाभाऱ्यातल्या जवळपास १५० मंदिरांच्या ठिकाणी कापूर प्रज्वलित केला जातो.
हेही वाचा – Bigg Boss 17: राखी सावंत पती आदिल खानबरोबर बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार? ड्रामा क्वीन खुलासा करत म्हणाली…
पुढे संकर्षण लिहीलं, “पहाटे ३/३.३० वाजता सगळा परिसर कापूरच्या ज्योतीने उजळेला पाहून काय प्रसन्न वाटत होतं. त्यात हे सगळं सनईच्या गोड आवाजात …हे करता करता देवीसमोरचं दार म्हणजे मुख्य गर्भगृह उघडलं जातं आणि देवीला “उठ उठ माते अरुणोदय झाला” अशी साद घालत जागं केलं जातं… देवीची काकड आरती केली जाते…काल सांगलीचा रात्रीचा प्रयोग करून मी पहाटे २.३० वाजता मंदिरात आलो हा सगळा सोहळा मला पहिल्यांदाच पाहता आला… अनुभवता आला…आणि तुम्हाला सांगतो; देवीच्या पायवर डोकं ठेऊन दर्शन घेता आलं…काय सांगावं कसं वाटलं.. माझे डोळे सतत भरून येत होते.. मनात काय भाव आले हे सांगताच येणार नाही, असा हा अनुभव होता.”
दरम्यान, संकर्षणच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, नाटका व्यतिरिक्त त्याच्या काही महिन्यांपूर्वी ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात त्याने अजिंक्यराजे निंबाळकर ही भूमिका साकारली होती. संकर्षणबरोबर या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळी, वैभव तत्ववादी, आलोक राजवाडे झळकले होते.