नाटक, मालिका, चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नेहमी चर्चेत असतो. संकर्षण त्याच्या कामामुळे जितका चर्चेत असतो, तितकाच तो त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेही चर्चेत असतो. सध्या संकर्षण रंगभूमी गाजवताना दिसत आहे. ‘तू म्हणशील तसं’, ‘नियम व अटी लागू’ ही नाटकं आणि ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम त्याचा रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. प्रेक्षक संकर्षणच्या या कलाकृतींना उदंड प्रतिसाद देताना दिसत आहे. याचनिमित्ताने अभिनेत्याच्या चाहत्यांबरोबर भेटीगाठी होतं आहेत. याचे किस्से तो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
संकर्षण कऱ्हाडेने नुकतीच एक पोस्ट केली आहे. ज्यामधून त्याने एका चाहतीचा किस्सा सांगितला आहे. त्या चाहतीने केलेल्या मेसेजच्या स्क्रीनशॉट शेअर करत संकर्षणने लिहिलं आहे, “काल साताऱ्यामध्ये प्रयोगानंतर एक मॅडम भेटल्या त्यांच्याविषयी थोडं शेअर करतोय. वेळ असेल तर वाचा. त्यांनी म्हणे १२ वर्षांपूर्वी टेलिव्हिजनवरती माझं काम पाहिलं आणि घरी आईला सांगितलं की, मला संकर्षण बरोबरचं लग्नं करायचंय. त्यावर बारावीतल्या त्या पोरीला आई म्हणाली, ‘अभ्यास करा…’ पुढे त्यांचं शिक्षण झालं, लग्नं झालं, दीड वर्षांचा त्यांना मुलगा आहे आणि आता त्या सातारामध्ये असतात. काल प्रयोगाच्या निमित्ताने त्या आवर्जून मला भेटल्या. त्यांचा नवरा त्यांना स्वतः असं म्हणाला की, बाळ झोपलं असेल तर नक्की भेटून ये जा आणि आमची भेट झाली. त्यांनी मला हे सगळं स्वतः सांगितलं…दीड वर्षांच्या झोपलेल्या बाळाला घरी ठेऊन अगदी साध्या वेशात आलेली ती आई मला हे सगळं सांगून गेली. किती गोड आहे यार हे…”
हेही वाचा – KGF फेम यशने नाकारली ‘रामायण’तील रावणाची भूमिका अन् ८० कोटींची ऑफर, आता दिसणार ‘या’ महत्त्वाच्या भूमिकेत
“प्रेक्षक आणि कलाकार यांच्या अनेक वर्षे एकत्रं होणाऱ्या या प्रवासाचंही मला कौतुक वाटलं…त्यांना मला हे मनमोकळेपणाने सांगावं वाटलं या भावनांचंही मला फार फार कौतुक वाटलं आणि बाळ झोपलं असेल तर त्यांना भेटून ये, बोल, हे म्हणणाऱ्या त्यांच्या नवऱ्याच्या समजुतदारपणाचंही मला खूपच कौतुक वाटलं…माझ्या नावावरुन त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव पण विष्णूचं ठेवलंय हे तर काहीच्या काही मस्त वाटलं… प्रेक्षकहो..असंच प्रेम करत राहा…भेटत राहा…मी जबाबदारीने काम करीन. (त्यांचं नाव, फोटो मुद्दाम टाकला नाही पण पोस्ट मात्र त्यांच्या परवानगीनेच करतोय)”, असं संकर्षणने लिहिलं आहे.
हेही वाचा – ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या शोच्या शूटिंगला झाली सुरुवात, अलका कुबल सेटवरील फोटो शेअर करत म्हणाल्या…
दरम्यान, संकर्षण नाटका व्यतिरिक्त टेलिव्हिजनवरील अनेक कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करताना दिसतो. जेव्हा ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून डॉ. निलेश साबळेंची एक्झिट झाली होती. तेव्हा सूत्रसंचालनाची जबाबदारी काही दिवसांसाठी संकर्षणकडे देण्यात आली होती.