कलाकारांची लग्नं, त्यांचे जोडीदार, मुले यांच्याविषयी प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता असते. आपले आवडते कलाकार लग्न कधी करणार, त्यांचा जोडीदार कोण आहे, त्यांची मुले काय करतात, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. आता अभिनेता संतोष जुवेकर(Santosh Juvekar)ने त्याला जोडीदार म्हणून कशी मुलगी हवी, यावर वक्तव्य केले आहे.
काय म्हणाला अभिनेता?
संतोष जुवेकरने नुकताच ‘लोकशाही फ्रेंडली’बरोबर संवाद साधला. यावेळी त्याला विचारण्यात आले की तुला तुझी जोडीदार कशी पाहिजे? यावर बोलताना संतोष जुवेकरने हसत उत्तर दिले की सगळ्याच गोष्टी आपल्या इच्छेने होत नाही. पुढे त्याने म्हटले की माझं असं कुठलंही म्हणणं नाहीये. पण, लोक म्हणतात जसं म्हणतात की दिसण्यावर वैगेरे विश्वास ठेवणार नाही, मनाने सुंदर हवी वैगेरे तर मी असं म्हणणार नाही. पण, मला चांगली सुंदर दिसणारी जोडीदार हवी आहे. बाकी माझं काहीच म्हणणं नाहीये. जर भविष्यात मला एखादी मुलगी आवडली आणि मला पुढे समजलं की तिला काहीच येत नाही. तरी मग मी जुळवून घेईन. जर माझं प्रेम असेल ना तर मी सगळं अॅडजस्ट करायला तयार होईन. पण त्याकरिता ती व्यक्ती तितकी आवडली पाहिजे किंवा त्या दृष्टीने मी विचार करायला सुरूवात केली पाहिजे. सध्या माझं छावा व पुढच्या काही सिनेमांवर लक्ष केंद्रित आहे.त्यावर फोकस करतोय आणि आता ही जी वेळ सुरू झाली आहे, ती आणखी कशी चांगली करता येईल, ती छान मोठी लांब कशी करता येईल, याचा विचार जास्त करतोय. पुढे अभिनेत्याने गंमतीने असेही म्हटले की, मला सुंदर मुलगी जोडीदार म्हणून हवी आहे, असं म्हटल्यामुले आता मुली मला ट्रोल करतील. तर असं काही नाहीये, नशीबात जे असेल ते होईल.
संतोष जुवेकरने सध्या त्याच्या छावा चित्रपटातील लूक व भूमिकेमुळे मोठ्या चर्चेत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात अभिनेत्याने रायाजी ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत विकी कौशल दिसणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तीरेखा विकी कौशलने साकारली आहे. संतोष जुवेकरने एका मुलाखतीत विकी कौशल छत्रपटी संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी योग्य असल्याचे म्हणत त्याचे कारणही सांगितले होते. या चित्रपटात रश्मिका मंदाना, अक्षय खन्नादेखील प्रमुख भूमिकेत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.