‘फक्त लढ म्हणा’, ‘रेगे’, ‘झेंडा’ यांसारख्या सिनेमातून आपल्या दमदार अभिनयानं अभिनेता संतोष जुवेकरनं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तसेच तो काही मालिकांमध्येही झळकला आहे. संतोषनं आपल्या अभिनय कौशल्यानं मराठीबरोबर हिंदीतही स्वतःची छाप उमटवली आहे. त्यानं हिंदी सिनेमा व वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. अशा या हरहुन्नरी अभिनेत्यानं सोशल मीडियावर नुकतीच एक भावुक पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.
हेही वाचा – नम्रता संभेरावनं दाखवली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील रिहर्सल, म्हणाली….
अभिनेता संतोष जुवेकरनं ‘मोरया’ या सिनेमाला बारा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं भावुक पोस्ट शेअर केली आहे. या सिनेमातील एका गाण्याचा व्हिडीओ शेअर करत त्यानं लिहिलं आहे की, “खूप काही दिलंय माझ्या बाप्पानं या सिनेमातून आम्हाला… खास करून मला…माझ्या काही आवडत्या सिनेमांपैकी हा सुद्धा एक माझ्या काळजातला माझा सिनेमा ‘मोरया’. बारा वर्ष झाली पण दरवर्षी बाप्पा येताना माझ्या सिनेमाची आठवणबरोबर घेऊन येतो. हा सिनेमा फक्त माझाच किंवा आमचा नाही तर हा सिनेमा त्या प्रत्येक चाळीचा, चाळीतल्या प्रत्येक गणेश उत्सव मंडळातल्या माझ्या प्रत्येक मित्राचा, सगळ्या गणेश भक्तांचा आहे.”
पुढे संतोषनं ‘मोरया’ सिनेमाचा दिग्दर्शक अवधूत गुप्तेचं आभार मानले. त्यानं लिहिलं की, “मित्रा अवधूत तू माझ्या पदरात टाकलेलं हे सोनेरी पान कायम माझ्या जवळ माझ्याबरोबरच असेल. खूप प्रेम मित्रा. खूप प्रेम आणि आभार एव्हरेस्ट एंटरटेंनमेंट आणि या सिनेमातल्या प्रत्येक कलाकारांचे आणि या सिनेमाशी जोडले गेलेल्या प्रत्येकाचे…गणपती बाप्पा मोरया”
हेही वाचा – “माझ्या कुटुंबात मी फक्त एकटाच देसाई आहे”; मंगेश देसाई यांनी सांगितलं आडनावामागचं रहस्य; म्हणाले…
दरम्यान, २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘मोरया’ सिनेमात संतोष जुवेकर व्यतिरिक्त अभिनेता चिन्मय मांडलेकर, स्पृहा जोशी, परी तेलंग, दिलीप प्रभावळकर असे बरेच कलाकार मंडळी होते.