मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सौमित्र अर्थात किशोर कदम हे अभिनयाबरोबरच उत्तम कवी आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात. आपल्या कवितेच्या माध्यमांतून ते अनेकदा सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर भाष्य करतात. नुकतीच सौमित्र यांनी थिंक बॅंक या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी २०१४ पासून देशात आणि महाराष्ट्रातील राजकारणात कसा बदल झाला, सामान्य नागरिकांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन याबाबत स्पष्ट मतं मांडलं.
एखाद्या कलाकाराने सामाजिक किंवा राजकीय भूमिका कराव्यात का? असा प्रश्न सौमित्र यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “मला असं वाटतं मी या मुलाखतीला आलो ही सुद्धा एक राजकीय भूमिका आहे. प्रत्येक गोष्ट ही राजकीय असते आणि हे ओळखण्याची कुवत प्रत्येक माणसामध्ये हवी. कलाकार कोणती भूमिका करतात हे पाहण्यापेक्षा, ते कसं काम करतात, किती मेहनत घेतात हे पाहणं जास्त गरजेचं आहे. आपल्याला जे वाटतं ते आपण आपल्या कामातून बोलावं. स्वत:ची राजकीय भूमिका लपवून ठेवणारे लोक घाबरट असतात असं मला म्हणावं लागेल.”
हेही वाचा : रजनीकांतच्या ‘जेलर’मधील ‘RCB’च्या जर्सीमधील ‘तो’ सीन हटवण्यात येणार; उच्च न्यायालयाकडून आदेश
“२०१४ नंतर आपल्या देशात एक सकारात्मक बदल झाला आहे. तो म्हणजे, आधी फक्त घरातील सोफ्यावर बसून आपण राजकारणाविषयी चर्चा करायचो. आज रिक्षावाला, वडापाववाला, फुटपाथवर झोपणारा भिकारी ते २३ व्या मजल्यावर राहणारा माणूस सगळेच राजकारणावर बोलत आहे. २०१४ नंतर हा खूप मोठा सकारात्मक बदल झाला असं माझं मत आहे. आता फुटपाथपासून ते २५ व्या मजल्यापर्यंत सगळे लोक एकमेकांशी राजकारणावर बोलू लागलेत…आधी असं नव्हतं.” असं मत किशोर कदम यांनी मांडलं आहे.
किशोर कदम पुढे म्हणाले, “आजच्या घडीला सगळ्या स्तरातील लोक राजकारणाविषयी बोलत आहेत आणि ही गोष्ट कोणीही मान्य करेल. २०१४ नंतर या गोष्टी प्रकर्षाने वाढल्या…हा खरंच चांगला बदल आहे. आपण एका वेगळ्या स्थित्यंतरातून पुढे जात आहोत, या दृष्टीने आपण या बदलाकडे पाहिलं हवं असं मला वाटतं.”